(Source: ECI/ABP News/ABP Majha)
4 महिन्यांपूर्वी स्वत:च्या लग्नासाठी गावाकडं आला तो शेवटचाच; शहीद प्रवीणच्या मित्राने आठवणींनी जागवली रात्र
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारतमातेचे दोन जवान शहीद झाले आहेत
अकोला : चार महिन्यांपूर्वीच तो गावी आला होता, सैन्यात भरती झालेल्या लेकाच्या लग्नासाठीचे सनई-चौघडेही तेव्हाच वाजले. घरात आनंद होता, गावात उत्साह होता, सगळीकडे आनंदी आनंद होता. लग्नामुळे दोन कुटुंबांच, दोन जीवांचं एक नवं नातं सुरू झालं होतं. पण, चारच महिन्यात दोन्ही कुटुंबातीला आनंदावर दु:खाचा डोंगर पसरला. काश्मीर खोऱ्यातील कुलगाम येथे दहशतवाद्यांचा खात्मा करताना महाराष्ट्रपुत्र, अकोल्याच्या भूमीतला लेक धारातीर्थी पडला. मुलगा शहीद झाल्याची बातमी कानी आली अन् गावावर शोककळा पसरली. अकोला जिल्ह्याच्या मोरगाव भाकरे येथील प्रवीण जंजाळ यांना शनिवारी सायंकाळी वीरमरण आलं. रेजिमेंटकडून फोनद्वारे संपर्क साधत गावात प्रवीण शहीद झाल्याची माहिती देण्यात आली.
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारतमातेचे दोन जवान शहीद झाले आहेत. या चकमकीत सैन्य दलाच्या जवानांनी चार दहशतवाद्यांचाही खात्मा केला. मात्र, दहशतावाद्यांचा सामना करताना झालेल्या चकमकीत भारतमातेचे दोन जवान शहीद झाले आहेत. त्यामध्ये, अकोला जिल्ह्यातील मराठमोळ्या प्रवीण जंजाळ यांनाही वीरगती प्राप्त झाली. रात्रीच्या सुमारास मोरगाव भाकरे गावात प्रवीण प्रभाकर जंजाळ हे जवान शहीद झाले आहेत, असा निरोप सैन्याच्या रेजिमेंटकडून आला आणि कुटुंबीयांचा आक्रोश सुरू झाला. आपल्या गावचा लेक सीमारेषेवर धारातिर्थी पडल्याचं समजताच गावावर शोककळा पसरली. दहशवाद्यांशी लढताना प्रवीण यांच्या डोक्याला गोळी लागली. रेजिमेंटकडून गावच्या सरपंच उमाताई माळी यांना फोनद्वारे संपर्क साधून ही माहिती देण्यात आली.
4 महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न
प्रवीण जंजाळ हे सेकंड महार रेजिमेंटमध्ये 2020 मध्ये भारतीय सैन्य दलात दाखल झाले होते. भरतीनंतर त्यांची पोस्टिंग मणिपूरमध्ये होती, पण 4 महिन्यांपूर्वी सैन्य दलाच्या राष्ट्रीय रायफलच्या क्रमांक एकच्या तुकडीत त्यांना कुलगाम जिल्ह्यात पाठविण्यात आले होते. विशेष म्हणजे नुकतेच 4 महिन्यांपूर्वी ते स्वत:च्या लग्नासाठी गावी आले होते, मोठ्या उत्साहात आणि आनंदात त्याचा विवाहसोहळा संपन्न झाला. मात्र, लग्नाच्या सुट्टीनंतर पुन्हा सीमारेषेवरील कर्तव्य ड्युटीवर ते रुजू झाले ते परतलेच नाहीत. लग्नासाठी गावी दिलेली भेट ही प्रवीण यांची अखेरची भेट ठरली. त्यामुळे, गावात हळहळ व्यक्त होत आहे. प्रवीण यांचे प्राथमिक शिक्षण गावात तर बारावीपर्यंतचे शिक्षण गायगाव येथे झाले आहे. त्यांच्या शहीद झाल्याचे वृत्त समजताच एकत्र येत, त्यांच्या मित्रांनी प्रवीण यांच्या गावातील शेवटच्या भेटीतील आठवणींनी रात्र जागून काढली. प्रवीण यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, मोठा भाऊ असा परिवार आहे.
प्रवीण यांचे दोन काकाही होते सैन्यदलात
प्रवीण हे सैन्यदलात दाखल झालेले जंजाळ कुटुंबातील तिसरे जवान होते. त्याच्या पूर्वी त्यांचे मोठेबाबा भास्करराव बाजीराव जंजाळ व त्यांचे काका रविंद्र जंजाळ हेही सैन्यदलात होते. भास्करराव यांचे चार वर्षांपूर्वी हृदविकाराने निधन झाले आहे.
नाकाबंदी व शोधमोहीम सुरूच
जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील फ्रिसल चिन्नीगाम भागात नाकाबंदी आणि शोधमोहीम सुरु असताना सैन्य दलाची दहशतावाद्यांशी चकमक झाली. त्यामध्ये भारतीय सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला.तर, दोन भारतीय जवानांना वीरमरण आलं. काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक वी.के. बिरधी यांनीकुलगाम येथे नाकाबंदी आणि शोधमोहीम सुरु राहील, असं म्हटलं आहे.सुरक्षा दलांना दहशतवाद्यांचे मृतदेह आढळले आहेत.