बिल थकवल्याने कोल्हापुरातील 541 शाळांचा वीजपुरवठा वर्षभरापासून बंद, किती शाळांची वीज खंडित?
लाखो रुपयांचे संगणक आणि स्मार्ट टीव्ही असून विद्यार्थ्यांना काडीचा उपयोग होत नाही, अशी अवस्था कोल्हापूरमध्ये पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील 541 शाळांचा वीजपुरवठा वर्षभरापासून खंडित झाला आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील 541 शाळांचा वीजपुरवठा गेल्या वर्षभरापासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण होत असतानाही आणि डिजिटल शिक्षण घेण्याची इच्छा असूनही विद्यार्थ्यांना हक्काचं शिक्षण घेता येत नाही. याचं कारण म्हणजे जिल्ह्यातील 541 शाळांची एकूण 12 कोटी रुपये थकित आहेत. त्यामुळे लाखो रुपयांचे संगणक आणि स्मार्ट टीव्ही असून विद्यार्थ्यांना काडीचा उपयोग होत नाही, अशी अवस्था जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे. परिणामी डिजिटल शिक्षण पद्धत ही नावालाच आहे का असा प्रश्न उपस्थित होतो.
मात्र आता मंत्रिमंडळात निर्णय झाला आहे. सरकारकडून ही थकबाकी भरली जाणार आहे. राज्यातील कोणत्याही शाळेची वीज थकबाकीच्या कारणाने खंडित होणार नाही असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला आहे.
कोणत्या तालुक्यात किती शाळांची वीज खंडित?
- शाहूवाडी तालुक्यात 267 शाळांपैकी 140 शाळांची वीज खंडित
- भुदरगड तालुक्यात 161 शाळांपैकी 99 शाळांची वीज खंडित
- हातकणंगले तालुक्यात 178 शाळांपैकी 88 शाळांची वीज खंडित
- चंदगड तालुक्यात 199 शाळांपैकी 71 शाळांची वीज खंडित
- राधानगरी तालुक्यात 205 शाळांपैकी 70 शाळांची वीज खंडित
- गगनबावडा तालुक्यात 70 शाळांपैकी 39 शाळांची वीज खंडित
- पन्हाळा तालुक्यात 194 शाळांपैकी 18 शाळांची वीज खंडित
- शिरोळ तालुक्यात 153 शाळांपैकी 14 शाळांची वीज खंडित
- कागल तालुक्यात 129 शाळांपैकी 2 शाळांची वीज खंडित
- गडहिंग्लज तालुक्यात 128 शाळांपैकी 2 शाळांची वीज खंडित
विजेच्या मुद्यावरुन राज्यभर गोंधळ उडाला आहे. अशा वेळी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचे काम कोणी करु नये अशी भावना विद्यार्थी आणि पालकांकडून व्यक्त केली जात आहे.
आता शाळांमध्ये एक मिनिटही वीजपुरवठा खंडित होणार नाही, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय
राज्यातील शैक्षणिक पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शाळांना अखंडित वीजपुरवठा देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काल (19 एप्रिल) ही घोषणा केली आहे. महाराष्ट्र सरकारही अनुदानावर शाळांना वीज पुरवठा करण्याचा विचार करत असल्याचं त्यांनी सांगितलं. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती दिली आहे. त्यांनी ट्वीट करुन सांगितले की, शाळांच्या थकित वीज बिलांसाठी सरकारने 14 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सर्व शाळांमध्ये वीज पुरवठा असेल आणि त्यांना वीजपुरवठा खंडित होणार नाही, असं आश्वासन वर्षा गायकवाड यांनी शाळांना दिलं आहे.