Popular Front Of India : एनआयएच्या कारवाईविरोधात पीएफआयची राज्यभर आंदोलनं, अनेक ठिकाणी नोंदवला निषेध
Popular Front Of India : एनआयएनं महाराष्ट्रात एटीएसच्या मदतीनं छापेमारी केली. महाराष्ट्रातून त्यांनी टेरर फंडिंग प्रकरणी 20 हून अधिक संशयितांना अटक केली.मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, जळगाव, जालना, कोल्हापूर, बीड, परभणी या जिल्ह्यांत एनआयएनं एटीएसच्या मदतीनं पीएफआयच्या कार्यालयावर छापे मारले.
Popular Front Of India : देशभरातील 11 राज्यात गुरुवारी एनआयएने पीएफआयच्या कार्यालयांवर छापेमारी केली. यावेळी त्यांनी 106 जणांना ताब्यात घेतलं. एनआयएनं महाराष्ट्रात एटीएसच्या मदतीनं छापेमारी केली. महाराष्ट्रातून त्यांनी टेरर फंडिंग प्रकरणी 20 हून अधिक संशयितांना अटक केली. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, जळगाव, जालना, कोल्हापूर, बीड, परभणी या जिल्ह्यांत एनआयएनं एटीएसच्या मदतीनं पीएफआयच्या कार्यालयावर छापे मारले. एनआयएच्या या छापेमारीनंतर राज्यातील अनेक मुस्लिम संघटना आक्रमक झाल्या आहेत. राज्यभरात या संघटनानी आंदोलनं केली आहेत. नांदेड, पुण्यासह महत्वाच्या शहरात एनआयएच्या विरोधात मुस्लिम संघटनांनी आंदोलन केलेय.
नांदेडमध्ये मुस्लिम सामाजिक संघटना आक्रमक
टेरर फंडिंग प्रकरणी NIA, ATS ने संयुक्त कार्यवाही करत बारा राज्यात छापे टाकून 106 जणांना अटक केलीय. नांदेड परभणीसह महाराष्ट्रात वीस ठिकाणी छापे मारले. नांदेडमध्ये एकास तर परभणी येथून चार जणांना अटक केली. दरम्यान पॉप्युलर फ्रंटच्या सदस्यांना 30 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे मुस्लिम संघटना आक्रमक झाल्या असून एनआयए, ATS आणि केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी नांदेडच्या मुस्लिम संघटना व पीएफआय संघटनेच्या वतीने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी सुरक्षेच्या कारणावरून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला. या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांच्या विशेष तुकड्या तैनात करण्यात आल्या. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ठीकठिकाणी बॅरिकटिंग लावण्यात आली.
PFI पदाधिकाऱ्यांच्या अटकेच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी -
जालना येथे PFI संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करत NIA च्या कारवाई विरोधात निषेध आंदोलन केलं. शहरातील मामा चौकात संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी जमा होत, NIA ने केलेली अटक बेकायदेशीर असल्याचा आरोप करत जोरदार निदर्शने केली. यावेळी आंदोलक कार्यकर्त्यांनी RSS च्या विरोधात घोषणाबाजी देखील केली. दरम्यान पोलिसांकडून या ठिकाणी मोठा फोजफाटा तैनात करण्यात आला होता.
बीडमध्ये पीएफआय संघटनेचं आंदोलन -
राज्यभरात पीएफआयच्या कार्यकर्त्यावर होत असलेल्या कारवाईच्या विरोधात बीडमध्ये आज बशीर गंज चौकामध्ये पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन एनआयए आणि एटीएस च्या विरोधात निदर्शने करत तीव्र घोषणाबाजी केली. पीएफआय या संघटनेला बदनाम करण्यासाठी सरकार आमच्या कार्यकर्त्यावर कारवाई करत असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला. सरकार आणि तपासणी करण्याच्या विरोधात देखील घोषणाबाजी करण्यात आली.
पुण्यात पोलिसांनी परवानगी नाकारली -
पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेकडून काल झालेल्या छापेमारीच्या निषेधार्थ आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार होते. मात्र पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली. मोजक्या चार लोकांसोबत जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्या, आशा सुचना पोलीसांनी पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या पदाधिकार्यांना केली. मात्र जिल्हाधिकाऱी कार्यालयासमोर हळु हळु लोक जमायला सुरुवात झाले. पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे.
परभणीत जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
एनआयए आणि एटीएसकडून करण्यात आलेल्या कारवाई विरोधात परभणीत विविध संघटनांनी एकत्र येऊन या कारवाईचा निषेध केलाय. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना भेटून या कारवाई विरोधात निवेदन देण्यात आले आहे. ज्यात ही करवाई एकतर्फी पद्धतीने करण्यात आल्याचा उल्लेख आहे. परभणी शहरातील विविध संघटनांचे प्रतिनिधी आज दुपारी एकत्र आले आणि या सर्वांनी मिळून पीएफआय या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर देशभरात केलेल्या कारवाईचा निषेध करत ही कारवाई एकतर्फी असून लोकशाहीमध्ये अशा प्रकारे कारवाई करून संघटनांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.
पीएफआयवर काय आरोप आहेत?
1)सीएए विरोधात निदर्शने करण्यासाठी पीएफआयकडून निधीचा देशभरात पुरवठा
२) 2020 साली दिल्लीतील दंगलीत दंगलखोरांना आर्थिक रसद पुरवली. जेएनयुचे उमर खालीद पैसे पुरवणाऱ्यांच्या संपर्कात होते
३) तबलिगी जमातीने कोरोना काळात दिल्लीत कार्यक्रम केला त्याला आर्थिक मदत केली
४) मंगळुरुमध्ये सीएएविरोधात निदर्शनात हिंसाचाराची घटना घडली. यामध्ये संघटनेचे २ कार्यकर्ते अटकेत
५) 2020 साली केरळमधील सोने तस्करी प्रकरणात संघटनेचा समावेश
६) श्रीलंकेतील 2019च्या बाॅम्बस्फोटप्रकरणात हात असल्याचा संशय