Ajit Pawar On Sharad Pawar : कॅन्सर झाल्यावर पवार डॉक्टरांना म्हणाले होते, तुम्हाला पोहोचवून मी जाणार, अजित पवारांनी किस्सा सांगितला
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना कॅन्सर झाला होता. त्यावेळी ते खचले नव्हते. उलट आजाराला नेटाने लढा दिला होता. त्यावेळी शरद पवार डॉक्टरांना काय म्हणाले होते तो किस्सा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज भर कार्यक्रमात सांगितला.
Ajit Pawar On Sahard Pawar : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद (Sharad Pawar) पवारांना कॅन्सर झाला होता. त्यावेळी ते खचले नव्हते. उलट नेटाने लढा दिला होता. त्यावेळी शरद पवार डॉक्टरांना काय म्हणाले होते तो किस्सा विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) आज पुण्यातील भर कार्यक्रमात सांगितला. शरद पवारांच्या या वागण्यावर तुमचा विश्वास बसणार नाही मात्र ते प्रचंड खंबीर आहेत, असं म्हणत त्यांनी शरद पवारांचं कौतुक देखील केलं. अजित पवार आज पुणे जिल्ह्यातील तळेगाव दौऱ्यावर आहेत. त्यांनी ऑक्सो लाईफ कॅन्सर सेंटरचं उद्घाटन केलं. त्यावेळी त्यांनी हा किस्सा प्रेक्षकांसमोर जाहीरपणे सांगितला.
अजित पवार म्हणाले की, "कॅन्सरचं निदान झाल्यावर शरद ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाले होते. एक-एक दिवस उशीर झाला तर आजार वाढणार होता. त्यावेळी आम्ही देखील घाबरलो होतो. ऑपरेशन देखील पार पडलं. तेव्हा डॉक्टरांनी प्रश्न विचारला होता. पवार तुमचं आयुष्य किती आहे, हे सांगू का? त्यावर नेमकं भाष्य काय झालं माहित नाही. पण साहेबांनी डॉक्टरला उत्तर दिलं की मी तुम्हाला पोहोचवल्यावर मी जाणार आहे. तुम्हाला पटणार नाही पण ते असंच म्हणाले. कॅन्सर झाला तरी खचून जाऊ नका, घाबरु नका, त्याचा सामना करायचा, असं शरद पवार कायम सांगत असतात. शिवाय कोणत्याही परिस्थितीत न घाबरता काम करणं, हे त्याच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे. आर. आर. पाटील यांनादेखील कॅन्सर झाला हे ज्यावेळी शरद पवारांना कळलं त्यावेळी त्यांनी आबांना त्यांनी फोन केला होता. त्यांचं सांत्वन केलं होतं आणि त्यांना खचून न जाता लढण्याचा सल्ला दिला होता. मात्र आबा खचले आणि महाराष्ट्राला एका चांगल्या नेत्याला मुकावं लागलं होतं. मात्र शरद पवार आजही काम करत आहेत आणि खंबीर उभे आहेत, असं सांगत त्यांनी शरद पवारांच्या खंबीरपणाचा दाखला दिला.
'आरोग्याची काळजी घेणं गरजेचं'
सध्याच्या काळात आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणं फार गरजेची आहे. आपण काही पथ्ये पाळली पाहिजे, परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, योगा केला पाहिजे, ताणतणाव दूर केला पाहिजे तरच आपण आशा आजारांना दूर करु शकतो. आरोग्यात वजन कमी पाहिजे, बाकी ठिकाणी वजन वाढलं तर काही नाही. जाड व्यक्ती मला दिसला तर मी आधी त्या व्यक्तीला बारीक होण्याचा सल्ला देतो, असं ते म्हणाले.
'गरिबांच्या किडन्या काढून जीवाशी खेळणाऱ्यांना फाशीचीच शिक्षा द्यायला हवी'
आपला देश जगात मेडिकल टुरिझम म्हणून ओळखला जातो. म्हणूनच परदेशातील अनेक रुग्ण भारतात उपचारासाठी येतात. आपला देश वैद्यकीय क्षेत्रात अशी भरारी घेत आहे. मात्र आजही आपल्या देशात गरीब रुग्णांच्या बाबतीत चुकीच्या घटना घडतात. त्यांना उपचारासाठी दाखल केले की किडनी काढून घेतात, जो माणसांच्या जीवाशी खेळतो त्यांना फाशीचीच शिक्षा द्यायला हवी. त्याशिवाय अशा गोष्टींना आळा बसणार नाही, असं त्यांनी स्पष्टच सांगितलं.
VIDEO : कॅन्सर झाल्यावर शरद पवार डॉक्टरांना काय म्हणाले होते? अजित पवारांनी 'तो' किस्सा सांगितला!