Narendra Modi : बंजारा समाजाप्रती काँग्रेसची कायम अपमानजनक नीती; पोहरादेवीच्या कार्यक्रमातून पंतप्रधान मोदींचा घणाघात
PM Narendra Modi: काँग्रेसने बंजारा समाजाप्रती आपली अपमानजनक वागणूक कायम ठेवली. असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी वाशिमच्या (Washim) सभेतून काँग्रेसवर घणाघाती टीका केली आहे.
PM Narendra Modi Visit in Poharadevi Washim : ज्यांना आजतगायत कोणी विचारलं नाही, त्यांना हा नरेंद्र मोदी आज पूजतो आहे. बंजारा समाजाने भारताच्या निर्मितीत, इथल्या संस्कृतीत फार मोठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कला, संस्कृती, राष्ट्रभक्ती, व्यापार इत्यदी प्रत्येक क्षेत्रामध्ये या समाजाच्या महापुरुषांनी, महान विभूतींनी देशासाठी काय नाही केलं? अनेकांनी समाजासाठी आपले सर्वस्व त्यागले. आमच्या बंजारा समाजातील कित्येक साधुसंत, महंतांनी राष्ट्रभक्ती आणि धर्मासाठी नवी चेतना दिली. मात्र, स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी या संपूर्ण समाजाला अपराधी घोषित केलं होतं. मात्र देशाच्या स्वातंत्र्यानंतर या देशाची जबाबदारी होती की, बंजारा समाजाची चिंता केली पाहिजे, त्यांना योग्य तो सन्मान दिला पाहिजे. मात्र तसे झाले नाही. त्यावेळच्या काँग्रेस (Congress) सरकारने नेमकं काय केलं? काँग्रेसच्या त्यावेळच्या सरकारने उलट या समाजाला मुख्य धारेपासून वेगळं केलं.
स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पार्टीवर ज्या परिवाराने ताबा मिळवला. त्यांची विचारधारा ही आधीपासूनच विदेशी राहिली आहे. त्यांना कायम वाटत राहिले आहे की, भारतावर कायम एका कुटुंबाचीच मक्तेदारी राहिली पाहिजे. कारण हा हक्क त्यांना ब्रिटिशांनी दिला होता. म्हणून त्यांनी बंजारा समाजाप्रती आपली अपमानजनक वागणूक कायम ठेवली. असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी वाशिमच्या (Washim) सभेतून काँग्रेसवर घणाघाती टीका केली आहे.
अर्बन नक्षल यांची टोळी काँग्रेस चालवत आहे- पंतप्रधान मोदी
काँग्रेसने त्यांच्या काळात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट केली. देशाला पुढे जाण्यास जे लोक अडवणूक करत आहेत, अशा लोकांचा सपोर्ट हा काँग्रेसला मिळतो आहे. आपण काँग्रेसपासून सावधान झाले पाहिजे. आपली एकता हीच या देशाला अबाधित ठेऊ शकणार आहे. नुकतेच दिल्लीमध्ये कोट्यावधी रुपयांचे ड्रग्स पकडण्यात आले. मात्र दुर्दैवी गोष्ट म्हणजे या ड्र्क्स रॅकेट मधील खरा सूत्रधार कोण निघाला? तर तो एक काँग्रेसचा नेता निघाला आहे. काँग्रेस युवकांना नशेच्या आहारी लावून त्या पैशातून निवडणूक लढवण्याचे प्रयत्न करत आहे. अर्बन नक्षल यांची टोळी काँग्रेस चालवत आहे. अशांपासून आपण सावधान झाले पाहिजे. सोबतच दुसऱ्यांना देखील सावधान केले पाहिजे. देशाविरुद्धची लढाई आपण सर्वांनी एकत्र येऊन लढली पाहिजे, असे आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले.
डबल इंजिन सरकारमुळे राज्यातील शेतकऱ्यांना डबल फायदा
हरियाणामध्ये आज मतदान होतं आहे. त्या अनुषंगाने हरियाणातील सर्व देशभक्तांना मी विनंती करतो की, जास्तीत जास्त लोकांनी मतदानाला जाऊन आपले बहुमूल्य मत दिले पाहिजे. आपले मत हरियाणाच्या विकासाला नव्या उंचीवर घेऊन जाईल. नवरात्रीच्या पवन पर्वावर मला पीएम किसान सन्मान योजनेचा 18 वी किस्त देता आली. देशातील साडेनऊ करोड शेतकऱ्यांच्या खात्यात 20 हजार करोड निधी देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील डबल इंजिनचे सरकार तर आपल्या शेतकऱ्यांना डबल फायदा मिळवून देत आहे. नमो शेतकरी महासन्मान योजने अंतर्गत राज्यातील 90 हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांना कोट्यावधी रुपयांच्या निधीचा वाटप करण्यात आला. पोहरादेवीच्या कृपाशीर्वादाने मला लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांनाही निधी देण्याचे सौभाग्य मिळाले. ही योजना नारी शक्तीचा सन्मान वाढवत आहे. असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
हे ही वाचा