पुण्याच्या हिंजवडीतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पालकंमत्री अजित 'दादां'चा प्लॅन
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात आज हिंजवडी औद्योगिक संघटनेच्या मागण्यांबाबत बैठक घेतली.
मुंबई : पुण्यातील जागतिक दर्जाचे आयटी हब (IT) अशी ओळख असणाऱ्या ‘राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यान’ परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासह या परिसरात नवीन उद्योग येण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात. या परिसरातील उद्योग, कर्मचारी आणि स्थानिक रहिवाशांच्या सोयीच्या दृष्टीने परिसरातील रस्त्यांचे रुंदीकरण, उड्डाणपूल, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प यासारख्या पायाभूत सुविधा गतीने पूर्ण कराव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले. पुण्याच्या (Pune) हिंजवडीतील वाहतूक कोंडी ही मोठी समस्या बनली आहे. त्या पार्श्वभूमीवर लवकरच विभागीय प्रशासकीय अधिकाऱ्यांना बैठक घेण्याच्या सूचनाही पालकमंत्री अजित पवार यांनी केल्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात आज हिंजवडी औद्योगिक संघटनेच्या मागण्यांबाबत बैठक घेतली. या बैठकीस वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशीष शर्मा, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचे आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल महिवाल यांसह सर्वच प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यावेळी, बैठकीत हिंजडीतील वाहतूक कोंडीवर चर्चा झाली. काही दिवसांपूर्वी हिंजवडीतील वाहतूक कोंडीमुळेही काही कंपन्या पुण्यातून बाहेर गेल्याची माहिती पुढे आली होती. त्याच दृष्टीने आता अजित पवार यांनी वाहतूक कोंडीसंदर्भाने बैठकीत महत्त्वाच्या सूचना केल्या.
या भागातील रस्ते रुंद करा - अजित पवार
या बैठकीत बोलताना अजित पवार म्हणाले की, पुण्याच्या विविध भागांतून उद्योग, नोकरीनिमित्त हिंजवडी आयटी परिसरात येणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. त्या तुलनेत याठिकाणचे रस्ते अरुंद आहेत, त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी या भागातील रस्ते रुंद करावेत, सर्वच रस्त्यांवर सहा मार्गिका ठेवाव्यात, आवश्यक ठिकाणी उड्डाणपूल उभारावेत, सेवारस्त्यांची रुंदी वाढवावी, उड्डाणपुलांच्या ठिकाणी असलेल्या केबल्ससाठी भूमिगत व्यवस्था उभारावी. अनधिकृत केबल्स काढून टाकाव्यात. रस्त्यालगत उभारण्यात आलेले अनधिकृत जाहिरात फलक काढून टाकून या परिसराचे सौंदर्यीकरण पूर्ववत करण्यात यावे. रस्त्यांवरील खड्डे भरावेत, दुभाजक आणि पदपथांच्या दुरुस्तीची कामेही तात्काळ मार्गी लावावीत. एमआयडीसी परिसराबाहेरील काही ठिकाणी पावसाचे पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे या पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था उभारावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
शुक्रवारी अन् शनिवारी पाहणी करण्याच्या सूचना
मागील काही वर्षांचा विचार करता हिंजवडी आयटी परिसरात वाहनांची एव्हढी रहदारी नव्हती. या परिसरात येणाऱ्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपन्या, तसेच परिसरात उभे राहणाऱ्या पूरक उद्योग-व्यवसायामुळे या भागात रहिवाशी आणि वाहनांची संख्या वाढत आहे. हिंजवडी परिसराचा वेगाने विकास करण्यासाठी या परिसरात पायाभूत सुविधांची गतीने उभारणी करणे गरजेचे आहे. त्यामुळे संबंधित सर्व यंत्रणांच्या प्रमुखांनी विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली येत्या शुक्रवारी आणि शनिवारी या भागाची पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.
उद्योजकांच्या अडचणींचे निकारण करा
उपमुख्यमंत्री अजित पवार बैठकीत मार्गदर्शन करताना म्हणाले की, हिंजवडी, माण, मारुंजी गावच्या हद्दीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून तीन टप्प्यांमध्ये राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यान विकसित करण्यात आले आहे. जागतिक पातळीवर त्याची आयटी हब म्हणून वेगळी ओळख निर्माण झाली आहे. येथील कंपन्यांना उद्योग सुलभ वातावरण देण्यास राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे. त्यामुळे पीएमआरडीए, पीसीएमसी, एमआयडीसी, पीडब्ल्यूडी आदी शासकीय यंत्रणांनी उद्योजकांना भेडसावणाऱ्या अडचणींचे समन्वयाने आणि तातडीने निराकरण करावे.