एक्स्प्लोर
व्हॉट्सअॅप-इन्स्टाग्रामवर छेडछाड, आयटी इंजिनिअर तरुणीकडे नग्न व्हिडीओची मागणी
"तुझा प्रायव्हेट फोटो माझ्याकडे आहे. मला ब्लॉक करु नकोस, मला ब्लॉक केलंस तर तो फोटो मुंबईच्या फेमस ग्रुपवर दिसेल." हे वाचून तरुणी हादरली.

पिंपरी चिंचवड : व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामचा आधार घेत, एका अज्ञाताने आयटी अभियंता महिलेची छेड काढल्याचा प्रकार समोर आला आहे. नग्नावस्थेतील एक मिनिटांचा व्हिडीओ पाठव, अन्यथा तुझा प्रायव्हेट फोटो मुंबईच्या फेमस ग्रुपवर दिसेल. तुझ्या मित्रांना पर्सनलीही ते फोटो शेअर करेन, अशी धमकीच त्याने दिली होती. या प्रकरणी पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. 24 वर्षीय तरुणी गुरुवारी कामात असताना, दुपारी 12 च्या सुमारास तिला व्हॉट्सअॅपवर मेसेज आला. "तुझा प्रायव्हेट फोटो माझ्याकडे आहे. मला ब्लॉक करु नकोस, मला ब्लॉक केलंस तर तो फोटो मुंबईच्या फेमस ग्रुपवर दिसेल." हे वाचून तरुणी हादरली. त्यानंतर त्याने तरुणीचा चेहरा आणि त्याखाली इतर महिलेचा नग्नअवस्थेतील जोडलेला फोटो पाठवला. "हा फक्त तुझा आणि माझा करार आहे," असा मेसेज पाठवला. "माझ्याकडे तुझ्या मित्रांची लिस्ट आहे. त्यांनाही हा फोटो पर्सनली शेअर करेन, असं नको असेल तर तुझा नग्नावस्थेतील एक मिनिटांचा व्हिडीओ पाठव. तो व्हिडीओ मी कोणाला पाठवणार नाही," असा त्याने मेसेज केला. पोलिसांना तक्रार केली तर तुझी खैर नाही, असा दमही भरला. तरुणीने कोणताही प्रतिसाद न दिल्याने त्याने व्हॉट्सअॅपवर कॉलही केला. इन्स्टाग्रामवरही असाच छळ सुरु होता. तरुणाचा हा विक्षिप्तपणा दोन दिवस सुरु होता. पण तिने निगडी पोलीस स्टेशन गाठलं आणि अज्ञातावर गुन्हा दाखल केला. ज्या नंबरवरुन आरोपी हा प्रताप करत होता, तो एकतर परदेशातील असावा किंवा एखाद्या अॅपवरील नंबर असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
आणखी वाचा























