PCMC News : काय सांगता! पिंपरी चिंचवडमध्ये वाहतूक नियम मोडणाऱ्यांकडून फक्त सात दिवसात 40 लाखांचा दंड वसूल
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेच्यावतीने 9 जानेवारी ते 15 जानेवारी या दरम्यान कायदा मोडणाऱ्या वाहनचालकांवर विशेष मोहीम राबविण्यात आली.
PCMC News : पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchwad News) पोलीस आयुक्तालयाच्या (Pcmc) वाहतूक शाखेच्यावतीने 9 जानेवारी ते 15 जानेवारी या दरम्यान कायदा मोडणाऱ्या वाहनचालकांवर विशेष मोहीम राबविण्यात आली. टिंटेड ग्लास, सुशोभित लायसन्स प्लेट्स किंवा कायद्याचं पालन न करणाऱ्या लायसन्स प्लेट्स असलेली वाहने सर्व पकडण्यात आली आहेत. त्यांच्याकडून तब्बल 40 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे कार्यक्षेत्र चाकण, भोसरी आणि तळेगाव औद्योगिक क्षेत्र, हिंजवडी, तळवडे आणि चिखली आयटी पार्क क्षेत्रांवर आहे. या परिसरात काम करणार्या लोकांची लोकसंख्या जास्त असल्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचे गुन्हे वारंवार घडतात. हे उल्लंघन कमी करण्यासाठी वाहतूक विभागाने ही कारवाई सुरू केली.
वाहतूक नियमांचं पालन करा, नाहीतर कारवाई
मोहिमेदरम्यान 4,853 जणांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून 40,31,600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. चारचाकी वाहनांमध्ये नंबर प्लेटच्या 2,022 आणि टिंटेड ग्लासच्या 2,831 प्रकरणांसाठी अनुक्रमे 27,43,700 रुपये आणि 12,87,900 रुपये दंड वसूल करण्यात आला. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असं आवाहन केले आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार वाहतूक विभागाकडून या उपक्रम वेगळ्या पद्धतीने हाताळले जातील. त्यामुळे वाहतूक नियमांचं पालन करा नाहीतर योग्य कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी नागरिकांना दिला आहे.
यापूर्वी बुलेट राजांकडून 22 लाखांचा दंड वसूल
पिंपरी-चिंचवड शहरातून सायलेन्सर बदलून बुलेट चालवल्या जातात आणि लोकांना फार याचा त्रास होत आहे, अशा तक्रारी आल्या होत्या. हा प्रकार आमच्या देखील निदर्शनास आला. मागील सहा महिने आपण बुलेटवर कारवाया केल्या. त्यात 22 लाखांचा दंड वसूल केला तरी काही चालकांमध्ये फरक पडलेला नाही,असं पोलिसांनी म्हटलं होतं. मॉडिफाय करण्यासोबतच, पर्यावरणाचा ऱ्हास करणे, यावरुन कारवाई केली जात आहे. आतापर्यंत दंडात्मक कारवाई केली होती. मात्र तरुणांची वागणूक पाहता आता आम्ही गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासोबतच हा प्रकार थांबला नाही तर वाहन देखील जप्त करण्याच्या विचार करत आहोत. त्यामुळे तरुणांनी नियमांचं पालन करावं नाहीतर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांनी दिला होता. हौशी आणि अतिउत्साही बुलेट राजांवर पिंपरी चिंचवड पोलिसांची करडी नजर असल्याचं चित्र आहे. या बुलेट राजांवर पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक पोलिसांकडून कडक दंडात्मक करावाई करण्यात येत आहे.