(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Petrol Diesel : नऊ राज्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी केल्या, महाराष्ट्र सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष
केंद्रानं अबकारी करात कपात केल्यानं पेट्रोल 5 रुपये तर डिझेल 10 रुपयांनी स्वस्त झालं. विधानसभा निवडणुकीला सामोरं जाणाऱ्या 5 राज्यांसह भाजपशासित 9 राज्यांनी व्हॅटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : केंद्र सरकारने प्रति लिटर पेट्रोलमागे 5 रुपये तर प्रति लिटर डिझेलमागे 10 रुपये कमी केले आहेत. केंद्र सरकारने पेट्रोलवरच्या आणि डिझेलवरच्या अबकारी करामध्ये घट केल्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमती उतरल्या आहेत. आता राज्यानेही आपल्या व्हॅट करात कपात करावी असंही आवाहन केंद्राकडून करण्यात आलं असून त्याला भाजप शासित नऊ राज्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आता महाराष्ट्र राज्य सरकार यावर काय भूमिका घेतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
केंद्र सरकारच्या या आवाहनाला प्रतिसाद देत उत्तर प्रदेश, गुजरात, गोवा, कर्नाटक, उत्तराखंड, आसाम, मणिपूर, त्रिपुरा, बिहार या भाजप शासित राज्यांनी त्यांच्या व्हॅटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या राज्यातील नागरिकांना आता तुलनेने स्वस्त दरात पेट्रोल मिळणार आहे.
Petrol-Diesel : नागरिकांना केंद्र सरकारची दिवाळी भेट, पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 10 रुपयांनी स्वस्त
महत्वाचं म्हणजे या व्हॅट कपात करण्याचा निर्णय घेतलेल्या नऊ राज्यांपैकी उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, गुजरात आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या भाजप शासित राज्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट आहे. इंधन दर कपातीचा निर्णय निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतल्याचा विरोधक आरोप करत आहेत.
केंद्र सरकारने आणि नऊ राज्यांनी पेट्रोल-डिझेलवरच्या करामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता महाराष्ट्रातही तशा प्रकारचा निर्णय घ्यावा अशी मागणी होताना दिसत आहे.
दरम्यान, इंधन दरकपातीवरुन संजय राऊतांनी मोदी सरकारला टोला लगावला आहे. पोटनिवडणुकीतल्या भाजपच्या पराभवानंतर पेट्रोलचे दर 5 रुपयांनी कमी झाल्याचं राऊत म्हणालेत. तर पेट्रोलचे दर 50 रुपयांनी कमी करायचे असतील तर देशभरात भाजपचा पराभव करावा लागेल, असंही राऊत म्हणालेत.
पण निवडणुकांच्या निमित्तानं का होईना सणासुदीच्या दिवसात महागाईच्या वणव्यात होरपळणाऱ्या जनतेला दिलासा मिळालाय. आता राज्य सरकारकडून जनतेला काय दिलासा मिळतोय ते पहावं लागेल.
पोटनिवडणुकीतील पराभवामुळे पेट्रोल 5 रुपये कमी झाले, 50 रुपये कमी करायचे असतील तर... : संजय राऊत