(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पोटनिवडणुकीतील पराभवामुळे पेट्रोल 5 रुपये कमी झाले, 50 रुपये कमी करायचे असतील तर... : संजय राऊत
Sanjay Raut Live Updates : दिवाळी साजरी करण्यासारखे वातावरण नाही. महागाई खूप झाली आहे, दिवाळी कशी साजरी करणार. 2024 साली हे ही दिवस बदलतील, असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
Sanjay Raut Live Updates : पोटनिवडणुकीतील पराभवामुळे पेट्रोलची किंमत 5 रुपये कमी झाली. 50 रुपये कमी करायचे असतील तर भाजपचा संपूर्ण पराभव करावा लागेल, असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. राऊत म्हणाले की, दिवाळी साजरी करण्यासारखे वातावरण नाही. महागाई खूप झाली आहे, दिवाळी कशी साजरी करणार. लोकांना कर्ज काढून सण साजरे करावे लागतात, तरी देखील आम्ही सर्वांना शुभेच्छा देतो, 2024 साली हे ही दिवस बदलतील, असं राऊत म्हणाले.
राऊत म्हणाले की, मोठं मन दाखवायला मन असायला लागतं, केंद्राने किमान 25 रुपये कमी करायला हवे होते. पेट्रोल डिझेलच्या भाववाढीतून बेहिशेबी पैसे सरकारने कमावले आहेत, असाही आरोप त्यांनी केला. शिवसेनेच्या विरोधात वातावरण नाही, विरोधी पक्षाच्या विरोधात वातावरण आहे, असं चित्र पाहिल्यांदाज बघायला मिळत आहे, असंही संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत म्हणाले की, केंद्रीय यंत्रणा या कोणाच्यातरी दबावाखाली काम करत आहेत. हे आम्ही आधीपासून सांगत आहोत, या तपास यंत्रणा आधी पण तोंडावर पडल्या होत्या. आता अनिल देशमुख प्रकरणी देखील तेच होणार आहे, दिवाळी सुरू आहे, अनिल देशमुख तुरुंगात आहेत, असं राऊत म्हणाले. यावेळी त्यांना बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता ते भावूक झाले. आज ते असते तर ही राजकीय परिस्थिती उद्भवलीच नसती, असं राऊत म्हणाले.
सामनातूनही केली टीका
आज सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे की, ऐन दिवाळीत भारतीय जनता पक्षाचे कंदील विझले आहेत. हा शुभशकुन नाही. आपणच अजिंक्य आणि अजेय आहोत या त्यांच्या अहंकारासही पोटनिवडणुकांच्या निकालांनी तडा गेला आहे. तेरा राज्यांतील पोटनिवडणुकांचे निकाल तेच सांगतात. लोकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या 29 जागांसाठी पोटनिवडणुका झाल्या. त्यात काँग्रेसने मुसंडी मारलीच, पण दादरा-नगर हवेली या लोकसभा मतदारसंघात शिवसेना जोरदार विजयी झाली आहे. महाराष्ट्राबाहेर शिवसेनेचा पहिला खासदार निवडून येण्याचा मान दादरा-नगर हवेलीच्या कलाबेन डेलकर यांना मिळाला आहे, असं सामनात म्हटलं आहे.