Saif Ali Khan Attacked Case: "बॉलिवूडवालों डरना..."; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य
Saif Ali Khan Attacked Case: अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
Ashish Shelar on Saif Ali Khan Attacked Case: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) वर त्याच्याच घरात घुसून चोरट्यानं जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात सैफ अली खान गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला तातडीनं लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तात्काळ सैफवर शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या पोलिसांकडून सैफच्या आरोपीचा शोध सुरू आहे. अशातच या सर्व घडामोडींवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. त्यावर बोलताना मंत्री आशिष शेलार यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले आहेत. मुंबई कालही सुरक्षित होती, आजही सुरक्षित आहे, उद्याही सुरक्षित असेल, अशी प्रतिक्रिया सैफवरील हल्ल्यानंतर आशिष शेलार यांनी दिली आहे. तसेच, लवकरच आरोपीला पकडण्यात यश येईल, असा विश्वासही आशिष शेलार यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.
अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. विरोधी पक्षांचं म्हणणं आहे की, जर मुंबईमध्ये अभिनेताच सुरक्षित नाही, तर सर्वसामान्य माणसांची तर काय परिस्थिती होईल? असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे. यावर बोलताना आशिष शेलार म्हणाले की, "बॉलिवूडवाल्यांनो डरना मना है, तुमच्यासोबत सरकार आहे..." त्यांनी पुढे बोलताना म्हटलं की, राजकारण करण्यासारखी ही घटना नाही. जितेंद्र आव्हाड आणि नाना पटोले यांना मी लवकरच उत्तर देईल.
बहुतेक बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्री आशिष शेलार यांच्या विधानसभा मतदारसंघात राहतात. सैफ अली खानपासून ते सलमान खान, शाहरुख खानपर्यंत, प्रत्येकाची घरं त्यांच्या विधानसभा मतदारसंघात आहेत. आशिष शेलार यांनी गुरुवारी लीलावती रुग्णालयात जाऊन सैफ अली खानची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
मुंबई हे जगातील सर्वात सुरक्षित शहर : आशिष शेलार
आशिष शेलार बोलताना म्हणाले की, "घडलेली घटना धोकादायक आहे. मुंबईत अशी घटना यापूर्वी कधीही घडली नव्हती. मुंबई शहर जगातील सर्वात सुरक्षित आहे. वांद्रे आज सुरक्षित होतं आणि उद्याही सुरक्षित राहील. आम्ही या प्रकरणाच्या मुळाशी जाऊ. इतक्या गंभीर घटनेनंतर, त्या आघातातून बाहेर पडण्यासाठी खान कुटुंबाला आधार देणं महत्वाचं आहे.
सैफ अली खानची प्रकृती आता कशी आहे?
बुधवार-गुरुवारी रात्री एका व्यक्तीनं घरात घुसून अभिनेता सैफ अली खानवर हल्ला केला. त्याच्या शरीरावर सहा जखमा आहेत. त्याच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की, प्राथमिक तपासात असं दिसून आलं आहे की, हल्लेखोर चोरीच्या उद्देशानं घरात घुसला होता.
सैफ अली खानबद्दल डॉक्टरांनी शुक्रवारी सांगितलं की, त्याला आयसीयूमधून हलवण्यात आलं आहे. पाहुण्यांना भेटण्यास मनाई करण्यात आली आहे. सैफला विश्रांतीची गरज आहे. सैफ आज स्वतःच्या पायानं चालला. काही हरकत नाही. संसर्ग रोखण्यासाठी पर्यटकांना रोखण्यात आले आहे.