सांगलीकरांची चिंता वाढली; सांगलीतून मुंबईत परतलेली व्यक्ती कोरोनाबाधित
सांगलीहून मुबंईत काही दिवसांपूर्वी परतलेली एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. ही व्यक्ती 20 मार्चपासून 10 एप्रिलपर्यंत सांगतील वास्तव्यास होती. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या एकूण 25 जणांना आता क्वॉरंटाईन करण्यात येणार आहे.
सांगली : सांगलीतील कोरोना व्हायरसचा संसर्ग नियंत्रणात येत असल्याचं चित्र निर्माण झालेलं असताना, सांगलीकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. नवी मुंबई येथील रहिवासी असलेली एक व्यक्ती वाळवा तालुक्यातील रेठरे धरण येथे आपल्या मूळ गावी 20 मार्च रोजी आली होती. सदर व्यक्ती रेठरे धरण येथून 10 एप्रिल रोजी मुंबईत परतली आहे. मात्र मुंबईत परतल्यानंतर या व्यक्तीची तब्येत बिघडली. उपचारसाठी या व्यक्तीला मुंबईच्या अपोलो हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं. तेथे सदर व्यक्तीची कोविड- 19 टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.
कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर अपोलो हॉस्पिटल यांच्याकडून खातरजमा करुन पालकमंत्री जयंत पाटील आणि जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार सांगली जिल्हा प्रशासनाने हालचाली सुरु केल्या. खबरदारीचा उपाय म्हणून सदर व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या अन्य 25 व्यक्तींना मिरज येथे आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ संजय साळुंखे यांनी दिली.
कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्व 25 व्यक्तींची कोरोनाची टेस्ट करण्यात येणार आहेत. सद्यस्थितीत या व्यक्तींमधील कोणालाही लक्षणे आढळत नाहीत. मात्र टेस्टनंतर ज्यांचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह येतील त्यांना आयसोलेशन कक्षात दाखल करून उपचार करण्यात येतील. तर ज्यांचे अहवाल निगेटिव्ह येतील त्यांना इन्स्टिट्यूशनल क्वॉरंटाइनमध्ये ठेवण्यात येईल.
इस्लामपूर शहरातील कोरोनाची साथ आटोक्यात येत असताना मूळचा वाळवा तालुक्यातील रेठरे धरण गावचा असलेल्या पण मुंबई स्थित असलेल्या एकाचा नवी मुंबईत कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने पुन्हा जिल्हाभर भीतीचे वातावरण पसरलं आहे. इस्लामपूर शहरातील कोरोनाची साथ आटोक्यात येत असतानाच इस्लामपूर शहराला लागून असलेल्या गावात कोरोनाचा रुग्ण सापडल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.संबंधित बातम्या
- राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1895 वर; धारावी, मालेगाव, नागपुरात रूग्णांच्या संख्येत कमालीची वाढ
- राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! दहावीच्या उर्वरित पेपरसह नववी, अकरावी परीक्षा अखेर रद्द
- मुंबईतील कोरोना हॉटस्पॉटची संख्या सात वर; 50 टक्क्यांहून अधिक रूग्ण सात वार्डमध्येच
- राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1895 वर; धारावी, मालेगाव, नागपुरात रूग्णांच्या संख्येत कमालीची वाढ