(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pandharpur News : विठ्ठल चरणी अर्पण करण्यात आलेल्या कोट्यवधींच्या दागिन्यांबाबत विधी व न्याय विभाग गंभीर नाही?
Pandharpur News : विठ्ठल चरणी अर्पण करण्यात आलेल्या कोट्यवधींच्या दागिन्यांबाबत विधी व न्याय विभाग गंभीर नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Pandharpur News : गोरगरिबांचा लोकदेव अशी ओळख असलेल्या विठुरायाच्या खजिनात गेल्या अनेक वर्षांपासून भाविकांकडून अर्पण केलेल्या कोट्यवधी रुपयाच्या सोने चांदीच्या लहान लहान वस्तूंचे एकत्रीकरण करण्याचा निर्णय होऊन दोन वर्षे झाली तरी अजूनही विधी व न्याय विभाग याबाबत गंभीर झालेला नाही. त्यामुळं 28 किलो सोनं आणि 996 किलो चांदीच्या हजारो वस्तू पोत्यात बांधून ठेवायची वेळ मंदिर समितीवर आलेली आहे. दोन वर्षांपूर्वी याबाबत मंदिर समितीनं या लहान लहान अर्पण केलेल्या वस्तू वितळवून सोने आणि चांदीच्या विटा करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा विठुरायाच्या खजिन्यात या लहान वस्तूंमध्ये 3 किलो सोने आणि चांदी 166 किलो चांदीमध्ये वाढ झाली आहे. अजूनही याचा निर्णय झाला नाही, तर दुसरीकडे भाविकांकडून अर्पण होणाऱ्या वस्तुंमध्ये वाढ होत राहणार आहे.
विठुरायाचे भक्त आपल्या ऐपतीप्रमाणे लहान सोन्याचे मणी, अंगठ्या, नथ, मंगळसूत्र, चैन असे विविध दागिने देवाच्या दक्षिण पेटित अर्पण करत असतात. विठुरायाच्या दक्षिण पित्याची मोजदाद होताना या अर्पण केलेल्या बहुतांश वस्तू, दागिने आढळून येतात. काही भक्त 1 ग्रॅम, 2 ग्रॅमच्या सोने चांदीच्या वस्तू थेट मंदिरात येऊन पावती करून जातात. दक्षिण मोजणीच्या वेळी या लहान लहान प्रेमाने अर्पण केलेल्या वस्तूंची नोंद समितीकडून ठेवण्यात येते. मोठ्या सोन्या चांदीच्या वस्तू, दागिने समिती देवासाठी वापरायला काढते. मात्र अशा लहान लहान हजारो वस्तूंचे वर्षानुवर्षे जपून ठेवणं मंदिर प्रशासनासाठी डोकेदुखी बनत चालली आहे.
भाविकांनी श्रद्धेनं आणि प्रेमाने अर्पण केलेल्या लहान लहान वस्तू कायमस्वरूपी देवाच्या खजिन्यात राहाव्यात यासाठी मंदिर समितीने या वस्तू वितळवून सोने आणि चांदीच्या विटा बनविण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी समितीने विधी व न्याय विभागाकडे यासंदर्भात पत्रव्यवहार देखील केला होता. अद्याप यावर कोणताही निर्णय न झाल्याने आज या वस्तूंची बाजारभावात किंमत वाढत चालली आहे. देवाच्या खजिन्यात असलेल्या या लहान वस्तूंमध्ये सोन्याच्या 28 किलो वजनाच्या वस्तू असून चांदीच्या 996 किलो वजनाच्या वस्तू जमा झाल्या आहेत. यातील सोन्याच्या वस्तूंची आजची किंमत जवळपास 13 कोटी 86 लाख रुपये तर चांदीच्या वस्तूंची किंमत 6 कोटी 42 लाख रुपये एवढी आहे.
देवाच्या खजिन्यातील 28 किलो सोने आणि 996 किलो चांदीच्या विटा बनविल्या तर हे ठेवणे समितीला सुलभ बनणार आहे. भाविकांकडून आलेल्या प्रेमाच्या भेटीची जपणूक देखील शक्य होणार आहे. आता विधी आणि न्याय विभागानं यात लक्ष घालून शासकीय नियमानुसार हे लहान लहान दागिने वितळवून त्यांच्या विटा बनविल्यास या हजारो भाविकांच्या श्रद्धाही होईल आणि देवाचा खजिना देखील समृद्ध होणार आहे.