पंढरपूर पोटनिवडणूक 2021 : भाजपचे समाधान आवताडे विजयी; भगीरथ भालकेंच्या पराभवाची कारणे?
भाजप आणि राष्ट्रवादीने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनवली होती. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक निकाल अपेक्षेप्रमाणे अतिशय घासून झाला. अनपेक्षितपणे भाजपने मारलेली मुसंडी राष्ट्रवादीला धक्का देणारी आहे.
पंढरपूर पोटनिवडणूक 2021 : राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडेंनी 3733 मतांनी बाजी मारली. दिवंगत भाजप भालके यांचे पुत्र आणि राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा आवताडेंनी पराभव केला. मतमोजनीत सुरुवातीपासूनच समाधान आवताडे यांनी आघाडी घेतली होती, ती विजयापर्यंत कायम राखली. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक निकाल अपेक्षेप्रमाणे अतिशय घासून झाला. अनपेक्षितपणे भाजपने मारलेली मुसंडी राष्ट्रवादीला धक्का देणारी आहे.
समाधान आवताडे आणि भगीरथ भालके यांनी मिळालेली मते
समाधान आवताडे
- ईव्हीएम- 1,07,774 मते
- पोस्टल - 1676 मते
- एकूण- 1,09,450 मते
भगीरथ भालके
- ईव्हीएम- 1,04,271 मते
- पोस्टल- 1446 मते
- एकूण- 1,07,717 मते
भाजप आणि राष्ट्रवादी तसेच महाविकास आघाडीनेही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनवली होती. भाजपकडून देवेंद्र फडणवीसांपासून चंद्रकांत पाटील असे सर्वच मोठे नेते येथे प्रचाराला उतरले होते. त्याचाच फायदा इथे समाधान आवताडेंना झाला. राष्ट्रवादीकडूनही उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांच्यासह महाविकास आघाडीतले अनेक नेते येथे तळ ठोकून होते. मात्र राष्ट्रवादीच्या या प्रचाराचं यशात रुपांतर झालं नाही. त्यामुळे भगीरथ भालकेंच्या पराभवाची नेमकी कारणं काय असतील याची याचा एक आढावा.
'जामिनावर सुटलेला आहात, जोरात बोलू नका अन्यथा महागात पडेल', चंद्रकांत पाटलांचा छगन भुजबळांना इशारा
राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांच्या पराभवाची कारणे?
- भाजप विजयात पहिली चूक राष्ट्रवादी उमेदवार निवडीत झाली. या निवडणुकीत भारत भालके यांच्या विधवा पत्नी जयश्री भालके यांना उमेदवारी दिली असती तर सहानुभूती मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीला मिळाली असती.
- सलग दोन निवडणुकांत दुसऱ्या क्रमांकाची मते घेणारे परिचारक गटाने पक्षाचा निर्णय मान्य करत समाधान आवताडे यांच्या उमेदवारीला पाठिंबा देत प्रामाणिक काम केल्याने परिचारक गटाची मते आवताडे यांना मिळाल्याने त्यांचा विजय सोपा झाला.
- प्रचार सभेत देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनाला जनतेने प्रतिसाद दिला आणि भरघोस मतदान केले.
- मंगळवेढा तालुक्यातील धनगर समाजाला आमदार गोपीचंद पडळकर यांचा घोंगडी बैठकीतील प्रचार आपलासा वाटला.
- मंगळवेढा जनतेने भूमिपुत्र म्हणून समाधान आवाताडे यांना पसंती दिली आणि सहानुभूती पेक्षा भूमिपुत्र जनतेने निवडून दिला.
- शेवटच्या दोन दिवसात राष्ट्रवादीचे नियोजन ढेपळल्याने त्याचा फायदा भाजपने उठवला.
- अजित पवार यांनी अनेकांना पक्ष प्रवेश देत नेत्यांची गर्दी केली तर या नेत्यांच्या मागची जनता मात्र भाजपाच्या मागे गेली. आणि यामुळेच अर्धे मंत्रिमंडळ प्रचारात उतरवून आणि पाच दिवस अजित पवार यांनी मुक्काम करत केलेले नियोजन फसले आणि भाजपने बाजी मारली.