![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
आंबा, काजू, जांबु फळांवर अवकाळी आणि गारपिटीचं संकट, अवकाळी पावसामुळे फळ उत्पादकांना नुकसानीची भीती
अवकाळी तुरळक पाऊस आणि गारपिटीमुळे बागायतदार पुन्हा एकदा संकटांत सापडला आहे. त्यामुळे फळगळती होऊन आर्थिक नुकसानीची भीती व्यक्त केली जात आहे.
![आंबा, काजू, जांबु फळांवर अवकाळी आणि गारपिटीचं संकट, अवकाळी पावसामुळे फळ उत्पादकांना नुकसानीची भीती Palghar News Fear of loss to fruit producers due to unseasonal rains आंबा, काजू, जांबु फळांवर अवकाळी आणि गारपिटीचं संकट, अवकाळी पावसामुळे फळ उत्पादकांना नुकसानीची भीती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/11/de57533df6400308f9fb004626fe49ca_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पालघर: पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, वाडा, डहाणू या तालुक्यातील काही भागात गुरुवारी तसेच शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या अवकाळी तुरळक पाऊस आणि गारपिटीमुळे बागायतदार पुन्हा एकदा संकटांत सापडला आहे. हंगामाच्या प्रारंभी आंबा, काजू, जांबू पिकाची फळगळती होऊन आर्थिक नुकसानीची भीती बागायतदारांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, उपाययोजना अंमलात आणण्याचे मार्गदर्शन कृषीतज्ञांनी शेतकऱ्यांना केले आहे.
लॉकडाऊन काळात या फळांची निर्यात खंडीत झाल्याने उत्पादकांचे मोठे नुकसान होऊन हंगाम वाया गेले होते. मात्र यंदा या झाडांना चांगला बहर आला आहे. त्यातच अवकाळीमुळे मोठं अस्मानी संकट ओढवले आहे. डिसेंबर महिन्यापासून जांबू फळांच्या हंगामाला प्रारंभ होऊन जूनपर्यंत तीन ते चार वेळा फुलोरा येऊन उत्पादन घेता येते. गतवर्षी जानेवारी महिन्यात सफेद, हिरवे, फिके व गडद लाल तसेच गडद गुलाबी रंगातील ही फळे बाजारात येण्यास सुरुवात झाली आहेत. या टप्प्यात फळांची संख्या कमी असली, तरी प्रति नग किंवा शेकड्यांनी विकल्या जाणाऱ्या या फळांना चांगला भाव असल्याची माहिती बागायतदारांनी दिली. मुंबईसह शहरातील नागरिकांचे हे पसंतीचे फळ असून हॉटेल व्यावसायिकांकडून सॅलेडसाठी लाल, हिरव्या जांबूला मोठी मागणी आहे.
दरम्यान, अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने विषम वातावरण आणि फळमाशीच्या प्रदूर्भावाने फळगळातीचा धोका वाढला आहे. त्यामुळे योग्य व्यवस्थापन करून उपाययोजना अंमलात आणण्याच्या सूचना कृषी तज्ञांनी केल्या आहेत. मागील दोन वर्षात मोठ्या प्रमाणात उत्पादन येऊनही लॉकडाऊनमुळे बाजारात या फळांची मागणी रोडावल्याने बागायतदारांना मोठा आर्थिक फटका बसला होता. यंदा पुन्हा जानेवारी महिन्यात संसर्ग वाढल्याने लॉकडाऊन लागल्यास नुकसानीची भीती उत्पादकांनी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे मासिक दोन दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे आंबा आणि काजू या झाडांना आलेला मोहर गळायला सुरुवात झाली आहे. तर जव्हार, मोखाडा, विक्रमगड भागात मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादन घेतले जातात. नवीन लागवड झालेल्या बागायतीमध्ये पाणी साचल्याने आणि गारपीट झाल्याने शेडनेट तसेच रोपांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बळीराजा अस्मानी संकटात सापडला आहे
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)