चक्क संसदेतच आढळला नोटांचा बंडल; काँग्रेस खासदाराच्या सीटखाली पैसे, सभागृहात गोंधळ
सध्या संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असून राज्यसभा सभागृहात आज एका खासदार महोदयांच्या जागेवरील सीटखाली नोटांचां बंडल आढळून आल्याने सारेच अवाक् झाले.
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या काळात आचारसंहिता सुरू असताना अनेक ठिकाणी नोटांचे बंडल सापडल्याचं पाहायला मिळालं. कधी कारमध्ये, कुठं बसमध्ये तर कधी मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या बॅगमध्येही पैसेच पैसे (money) असल्याचं दिसून आलं. मात्र, आता चक्क देशाच्या संसद भवनातील एका खासदार महोदयांच्या सीटखाली नोटांचा बंडल आढळून आल्याने संसदेत (Parliment) चांगलाच गदारोळ माजला आहे. त्यातच, काँग्रेस खासदार आणि ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु संघवी यांच्याच सीटखाली हा नोटांचा बंडल सापडल्याने संसदेतील सत्ताधारी पक्षाने जोरदार हल्लाबोल केला आहे.
सध्या संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असून राज्यसभा सभागृहात आज एका खासदार महोदयांच्या जागेवरील सीटखाली नोटांचां बंडल आढळून आल्याने सारेच अवाक् झाले. त्यानंतर, सभागृहात खासदारांचा एकच गोंधळ पाहायला मिळाला. राज्यसभा सभापती जगदीश धनखड यांनी सभागृहाला माहिती दिली. याच मुद्द्यावरुन राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे सभागृहात बोलण्यासाठी उठले असता सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी गोंधळ सुरू केला. त्यामुळे, खर्गे यांनी संताप व्यक्त करत भाजप खासदारांना सुनावलं, असलं चिल्लर काम करुन तुम्ही देशाला बदनाम करत आहात, असे खर्गे यांनी म्हटले.
जगदीश धनखड यांनी सभागृहाला माहिती देताना सांगितले की, मला मिळालेल्या माहितीनुसार एका रुटीन अँटी सेबाटोज तपासादरम्यान काल सभागृहाचं कामकाज संपल्यानंतर सभागृहातूनच नोटांचां बंडल ताब्यात घेण्यात आला आहे. सभागृहातील सीट नंबर 222 च्या खाली हा नोटांचा बंडल आढळून आल्याची माहितीही त्यांनी दिली. तेलंगणातून राज्यसभा खासदार असलेल्या अभिषेक मनु सिंघवी यांच्यासाठी ते 222 नंबरचे सीट अलोट केलेले आहे, तिथंच हा नोटांचा बंडल आढळून आल्याचे सभापतींनी सांगितले. या माहितीनंतर खासदार सिंघवी यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. ''मी 500 रुपये घेऊन संसदेत जात असतो, काल दुपारी 12 वाजून 57 मिनिटांनी मी संसदेत पोहोचलो, तिथून 1 वाजता बाहेर पडलो. दुपारी दीड वाजेपर्यंत मी संसदेच्या कँटीनमध्येच होतो,'' अशी प्रतिक्रिया अभिषेक मनु सिंघवी यांनी दिली.
सत्ताधारी आणि विपक्ष यांच्यात जुंपली
दरम्यान, या घटनेचा संपूर्ण तपास होईपर्यंत कुणाच्या सीटखाली तो बंडल सापडला त्यांचे नाव जाहीर करायला नव्हते पाहिजे, असे मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले. त्यावरुन भाजप खासदारांनी गोंधळ सुरू केला होता. तर, ही घटना अतिशय गंभीर असल्याचं भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी म्हटलं आहे. सभागृहाच्या प्रतिमेला तडा जाण्याचं काम या घटनेनं होऊ शकतं, असेही नड्डा यांनी म्हटलं.
हेही वाचा
गृह खात्याऐवजी भाजपकडून एकनाथ शिंदेंना 3 पर्याय; शिवसेना तोडीस-तोड खात्यासाठी आग्रही