एक्स्प्लोर
Advertisement
पालघरमध्ये शिवसेनेला धक्का, श्रीनिवास वनगा हरले!
पालघर लोकसभा पोटनिवडणूक: भाजपचे राजेंद्र गावित यांनी पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत बाजी मारली आहे. त्यांनी शिवसेनेच्या श्रीनिवास वनगा यांचा पराभव केला.
पालघर: राज्याचं लक्ष लागलेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणूक 2018 चा निकाल जाहीर झाला. भाजपचे राजेंद्र गावित यांनी या निवडणुकीत 29 हजार 572 मतांनी विजय मिळवला. राजेंद्र गावित यांनी शिवसेनेच्या श्रीनिवास वनगा यांचा पराभव केला.
राजेंद्र गावित यांना 2 लाख 72 हजार 782 मतं मिळाली. तर दुसऱ्या क्रमांकावरील शिवसेनेच्या श्रीनिवास वनगा यांना सुमारे 2 लाख 43 हजार 210 मतं मिळाली.
बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांनीही 2 लाख 22 हजारांपेक्षा जास्त मतं मिळवली. तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या किरण गहला यांना जवळपास 71 हजार मतं मिळाली.
काँग्रेसला या निवडणुकीत मोठी मजल मारता आली नाही. काँग्रेसचा उमेदवार दामोदर शिंगडा हे पाचव्या क्रमांकावर राहिले.
भाजपचे खासदार चिंतामन वनगा यांच्या निधनामुळे इथे पोटनिवडणूक झाली.
चिंतमन वनगा यांचे सुपुत्र श्रीनिवास वनगा यांनी भाजपने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत, शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेने त्यांना पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दिली होती. त्यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये टोकाचे आरोप झाले.
महत्त्वाचं म्हणजे मूळचे काँग्रेसचे असलेले राजेंद्र गावित हे या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या काही तास अगोदर भाजपमध्ये आले होते.
राजेंद्र गावित यांची प्रतिक्रिया
या विजयानंतर भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी विजयाचं श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे कार्यकर्ते आणि आघाडी सरकारच्या काळात स्वत: केलेलं काम याला दिलं.
मंत्रिपदाचा अनुभव असल्यामुळे येत्या वर्षभराच्या काळात कामाचा सपाटा लावू असं राजेंद्र गावित म्हणाले.
..म्हणून काँग्रेस सोडली
यावेळी राजेंद्र गावित यांनी काँग्रेस का सोडली याबाबतचं कारण सांगितलं. काँग्रेस नेत्यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याने, काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याचं गावित म्हणाले.
श्रीनिवास वनगा यांची प्रतिक्रिया
या निवडणुकीत शिवसेनेचे श्रीनिवास वनगा यांचा पराभव झाला. या पराभवानंतर वनगा थेट काम करण्यासाठी शेतात गेले.
एबीपी माझाने त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. श्रीनिवास वनगा म्हणाले, “मला मतदान करणाऱ्या सर्वांचे आभार. कमी काळात आम्ही मेहनत घेऊन सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. भाजपने साम-दाम-दंड-भेदचा वापर केला. चुका झाल्या त्याचं चिंतन करु, पण 2019 मध्ये पुन्हा पालघर जिंकू”
कोण आहेत राजेंद्र गावित?
राजेंद्र गावित हे आदिवासी समाजातील मोठा चेहरा आहेत. काँग्रेसमध्ये असताना ते आदिवासी विकास राज्यमंत्री होते. ते मूळचे नंदुरबारचे आहेत. पालघरमधून आमदार म्हणून निवडून आले होते. 2014 सालची लोकसभा निवडणूक काँग्रेसकडून लढले, मात्र पराभूत झाले. 2016 साली विधानसभा पोटनिवडणुकीतही त्यांचा पराभव झाला होता.
पालघर लोकसभा पोटनिवडणूक निकाल 2018
पालघर लोकसभा पोटनिवडणूक अंतिम निकाल
राजेंद्र गावित (भाजपा)- 2 लाख 72 हजार 782 (विजयी)
श्रीनिवास वनगा (शिवसेना) 2 लाख 43 हजार 210
बळीराम जाधव (बविआ) 2 लाख 22 हजार 838
दामोदर शिंगडा (काँग्रेस) 47 हजार 714
किरण गहला, (माकपा) 71 हजार 887
शंकर बदादे (अपक्ष) 4884
संदीप जाधव (अपक्ष) 6670
नोटा 16884
राजेंद्र गावित 29 हजार 572 मतांनी विजयी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भविष्य
महाराष्ट्र
पुणे
Advertisement