PACL scam: संजय राऊत यांच्या अडचणी वाढणार? प्रवीण राऊतांना दिल्लीला नेण्याची ईडीला परवानगी
Sanjay Raut : कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी (Patra Chawl Land Scam) शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
Shiv Sena MP Sanjay Raut : कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी (Patra Chawl Land Scam) शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांचे निकवर्तीय प्रवीण राऊत यांना चौकशीसाठी दिल्लीला नेण्यासाठी कोर्टाकडून ईडीला परवानगी मिळाली आहे. प्रवीण राऊत यांना काही विशेष अटीशर्तीवर मुंबई सत्र न्यायालयाने दिल्लीला नेण्यास ईडीला परवानगी दिली आहे. प्रवीण राऊत शिवसेना नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जातात. तसेच, प्रवीण राऊतांचं नाव PMC घोटाळ्यातही आलं होतं. ज्याचा तपास सुरु आहे.
पण, पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी प्रवीण राऊत यांच्या जामीनावरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत ईडीला प्रतिक्षा करावी लागणार आहे. त्यानंतर ईडी त्यांना चौकशीसाठी दिल्लीला घेऊन जाऊ शकते. पण दिल्लीला नेण्यापूर्वी ईडीला कोर्टात हमीपत्र देण्याचे निर्देश सत्र न्यायालयाने दिले आहेत. या हमीपत्रात आरोपीला दिल्लीतील चौकशी संपल्यानंतर मुंबई सत्र न्यायालयात पुन्हा हजर करू असा उल्लेख करणं अनिवार्य आहे. पीएसीएल (पर्ल्स एग्रोटेक कार्पोरेशन लिमिटेड) या कंपनीच्या भ्रष्टाचार प्रकरणात दिल्लीत दाखल गुन्ह्यात ईडी राऊत यांची चौकशी करणार आहे. पीएसीएलने शेतजमिनीच्या विक्री आणि विकासाच्या नावाखाली गुंतवणूकदारांकडून 49 हजार 100 कोटी रुपये गोळा केले होते, असा आरोप आहे. या प्रकरणी आता ईडी चौकशी करणार आहे.
काय आहे पत्राचाळ घोटाळा?
पत्राचाळ जमीन घोटाळा 1,034 कोटी रुपयांचा आहे. नेमका काय आहे हा घोटाळा, हे जाणून घेऊया. मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचं काम देण्यात आलं होतं. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला, असा आरोप आहे. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळचे 3 हजार फ्लॅट बांधकाम करायचं होतं, त्यापैकी 672 फ्लॅट येथील भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती. परंतु, 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 258 टक्के शेअर एचडीआयएलला विकले. यानंतर 2011, 2012 आणि 2013 मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खाजगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले.