Maharashtra Rain : आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट तर राज्याच्या इतर भागात यलो अलर्ट
आज हवामान विभागानं राज्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज कोकणात पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. तर उर्वरीत महाराष्ट्रात पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे.
Maharashtra Rain : हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस (Rain) झाला आहे. मुंबईसह ठाणे परिसरात रात्री पावसानं जोरदार हजेरी लावली. या पावसाचा वाहतुकीवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळालं. पावसामुळं सखल भागात पाणी साचल्यानं वाहतूक संथ गतीनं सुरु होती. तसेच पुणे, सोलापूर या जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, आजही हवामान विभागानं राज्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज कोकणात पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. तर उर्वरीत महाराष्ट्रात देखील पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे.
यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय?
यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय असा प्रश्न सगळ्यांना पडला असेल. तर या यलो अलर्टमध्ये हवामान खात्यानं हलक्या पावसाची शक्यता वर्तवलेली असते. तसेच यलो अलर्ट हा सावध राहण्यासाठी दिला जातो. हा इशारा वॉचसाठी दिलेला असतो. जेव्हा हवामानात बदल होतो तेव्हा हा अलर्ट दिला जातो. तुम्हाला तत्काळ धोका नाही. परंतु, हवामानाची स्थिती पाहता, तुम्ही ठिकाण आणि तुमच्या प्रवासाची काळजी घेतली पाहिजे, असे या अलर्टचा अर्थ आहे.
ऑरेंज अलर्ट म्हणजे नेमकं काय?
कोकणात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुसळधार पाऊस असेल त्या ठिकाणी ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून दिला जातो. ऑरेंज अलर्टमध्ये, रेड अलर्टपेक्षा थोडी कमी धोकादायक स्थिती असते. ऑरेंज अलर्टचा अर्थ त्या भागात कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते.
उद्यापासून पावसाचा जोर अधिक वाढणार
दरम्यान, शनिवारी संपूर्ण महाराष्ट्रात हवामान विभागानं पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला होता. त्यानुसार राज्याच्या विविध भागात पावसानं हजेरी लावली आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार उद्यापासून (12 सप्टेंबर) राज्यात पावासाचा जोर अधिक वाढणार आहे. 12 सप्टेंबरपासून कोकणसह मुंबई आणि ठाण्यात पावसाचा जोर वाढणार आहे. तसेच घाट भागातही मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळं नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.
जायकवाडी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरु
मराठवाड्यात देखील पावसानं चांगली हजेरी लावली आहे. या पावसामुळं नदी नाल्यांच्या आणि धरणांच्या पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात जायकवाडी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग वाढवण्यात आला आहे. त्यामुळं, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जायकवाडी धरणातून सध्या 76 हजार 556 क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. तर धरणाचे एकूण 18 दरवाजे उघडण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडी धरणातील पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे पाण्याचा निसर्गही वाढवण्यात आला आहे.
उजनी धरणातूनही विसर्ग सुरु
सोलापूर (Solapur)जिल्ह्यातही पाऊस सुरु आहे. पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तसेच धरणांच्या पाणीसाठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यातील उजनी धरन (Ujani dam) देखील ओव्हरफ्लो झालं आहे. त्यामुळं धरनातून भीमा नदीत पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळं भीमा नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे.
जूनपासून आत्तापर्यंत राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. आत्तापर्यंत राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, राज्यात चांगला पाऊस झाल्यामुळं नदी आणि धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील लहान, मध्यम आणि मोठ्या धरणांमध्ये मिळून 85 टक्के पाणीसाठा आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Ujani dam : उजनी धरणातून 60 हजार क्यूसेकनं पाण्याचा विसर्ग, भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
- Beed Rain : बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, माजलगावच्या पद्मावती नदीला पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला