Ujani dam : उजनी धरणातून 60 हजार क्यूसेकनं पाण्याचा विसर्ग, भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील उजनी धरण (Ujani dam) देखील ओव्हरफ्लो झालं आहे. त्यामुळं धरनातून भीमा नदीत पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
Ujani dam : सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Rain)पडत आहे. या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तसेच धरणांच्या पाणीसाठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील उजनी धरन (Ujani dam) देखील ओव्हरफ्लो झालं आहे. त्यामुळं धरनातून भीमा नदीत पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. उजनी धरणातून सध्या भीमा नदीत 60 हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळं भीमा नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे.
दरम्यान, भीमा नदीत सध्या उजनीतून 60 हजार क्यूसेकने विसर्ग सुरु करण्यात आला आहे. यामुळं नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्क केलं आहे. तसेच पंढरपू प्रशासन देखील सतर्क झालं आहे. कारण चंद्रभागा नदीला देखील पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चंद्रभागा नदीत 85 हजार क्युसेकचा विसर्ग पोहोचल्यानंतर परिस्थिती अवघड बनण्यास सुरुवात होणार आहे. चंद्रभागेत 1 लाख 10 हजार क्युसेकच्या विसर्गाने पाणी आल्यास शहरातील व्यास नारायण मंदिर, बडवे चर याठिकाणी पाणी शिरण्यास सुरुवात होते. यासोबतच सरकोली, पटवर्धन कुरोली, उंबरे पागे यासारख्या ग्रामीण भागातील 8 गावात देखील पाणी शिरण्यास सुरुवात होते. दरम्यान, पंढरपूर तालुक्यात भीमा नदीच्या उजव्या काठावर 13 तर डाव्या तीरावर 28 गावे आहेत. याशिवाय ओढे आणि नाल्यात हे नदीचे पाणी शिरुन धोका होणारी काही गावे असून, एकूण 46 गावांना पुराचा धोका संभवू शकतो.
राज्यात विविध ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी
राज्याच्या विविध भागात पावसानं हजेरी लावली आहे. उघडीप दिलेल्या पावसानं पुन्हा एकदा जोर धरला आहे. मुंबईसह, ठाणे नवी मुंबई, पालघर या परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली आहे. तर दुसरीकडे, पुणे नागपूर कोकणातील सिंधुदुर्गमध्येही मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. आजही अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, आजही राज्यात कोकणसह, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यात देखील जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. लातूर शहरालगत असलेल्या अनेक शेतांमध्ये पाणी साचल्यानं पिकांचे नुकसान झालं आहे. अनेक दिवसांच्या उघडीपीनंतर झालेल्या या तुफान पावसामुळं पिकांना जीवदान मिळण्याऐवजी पिकं वाहून जाण्याची वेळ आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: