डोंबिवली बलात्कार घटनेनंतर विरोधक आक्रमक, राष्ट्रवादीच्या महिला नेत्याकडून आरोपींना ताब्यात देण्याची मागणी
डोंबिवलीत एक खळबळजनक घटना समोर आली आहे. डोंबिवलीमध्ये 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराची (Dombivli Rape Case) घटना उघडकीस आलीय. घटनेनंतर राजकीय नेत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया.
डोंबिवली : डोंबिवलीमध्ये 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे डोंबिवली हादरली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात 29 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर दोन अल्पवयीन मुलांसह 23 जणांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेनंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं असून सत्ताधारी नेत्यांनीही संताप व्यक्त करत दोषींनी कडक शासन देण्याची मागणी केली आहे.
अतिशय भयंकर आणि संतापजनक : फडणवीस
डोंबिवलीच्या भोपरमध्ये 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 30 जणांनी बलात्कार केल्याची घटना ऐकून मन सुन्न झाले. महिला अत्याचाराची सातत्याने वाढणारी ही प्रकरणे चीड आणणारी आहेत, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
अतिशय भयंकर आणि संतापजनक ❗️
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 23, 2021
डोंबिवलीच्या भोपरमध्ये 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 30 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना ऐकून मन सुन्न झाले.
महिला अत्याचाराची सातत्याने वाढणारी ही प्रकरणे चीड आणणारी आहेत. #DombivaliRape #Rape #disgusting https://t.co/DqRHTnRfrn
डोंबिवलीच्या घटनेनंतर तरी महिलांसाठी विशेष अधिवेशन सरकार घेईल अशी अपेक्षा : मुनगंटीवार
डोंबिवली घटना थरकाप उडवणारी आणि मन सुन्न करणारी आहे. आणि हे सरकार अधिवेशन घेणार नाही असं सांगतंय. महिला अत्याचाराच्या घटना सांगायला सुरुवात केली तर चोवीस तास कमी पडतील. तुमची सत्ता हजार वर्षे ठेवा पण महिला सुरक्षित ठेवा. अशा घटना थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सरकार बलात्कारासारख्या गंभीर विषयावर चर्चा करत नाही. विशेष पोलीस पथक तयार करून तातडीने अशा प्रकरणाचा निकाल लावला पाहिजे. गुन्हा करणाऱ्या लोकांच्या मनात धडकी भरली पाहिजे. पण यावर उपाययोजना करण्यापेक्षा मुख्यमंत्री राज्यपालांनी फॉरवर्ड केलेल्या निवेदनाला उत्तर देत आहेत. आता डोंबिवलीच्या घटनेनंतर तरी महिलांसाठी विशेष अधिवेशन सरकार घेईल अशी अपेक्षा आहे, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली आहे.
आरोपींना आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्यांची धिंड काढू : विद्या चव्हाण
डोंबिवली बलात्कारातील आरोपींना आमच्या ताब्यात द्या. आम्ही त्यांची धिंड काढू अशी संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी दिली आहे. चव्हाण यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात भेट दिल्यानंतर ही प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात आरोपी आमच्या ताब्यात द्या आशा घोषणा दिल्या.
आता सांगा संजय राऊतजी कोणाचं थोबाड फोडायचं : भाजप नेत्या चित्र वाघ
डोंबिवलीमध्ये घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असून आणखी किती बलात्कार झाल्यानंतर सरकारला जाग येईल असा सवाल चित्रा वाघ यांनी करत संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. रोज घटना होत असताना आता थोबाड कोणाचं फोडायचं विरोधकाचं की सरकारचं अशी खरमरीत टीका राऊत यांच्यावर वाघ यांनी केली आहे.
काय आहे घटना?
डोंबीवलीत राहणाऱ्या एका 15 वर्षीय मुलीने मानपाडा पोलीस ठाण्यात तिच्यावर 8 महिन्यांपासून लैंगिक अत्याचार सुरू असल्याबाबत तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी पीडित तरुणीला विश्वासात घेत चौकशी सुरू केली. या चौकशीमध्ये जे समोर आलं ते ऐकून पोलीस हैराण झाले. जानेवारी महिन्यात पीडित तरुणीवर तिच्या प्रियकराने बलात्कार करत तिचा व्हिडीओ काढला. हा व्हिडीओ या तरुणाने आपल्या मित्रांना दाखवला.
या व्हिडीओच्या आधारे पीडितेला धमकी देत 29 जणांनी या पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले. बदलापूर, रबाळे, मुरबाड आणि डोंबिवलीत वेगवेगळ्या ठिकाणी तिला घेऊन जाऊन तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी आतापर्यंत 23 जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यामधील दोन अल्पवयीन असल्याची देखील माहिती आहे. 21 आरोपींच्या अटकेनंतर पोलीस सहा आरोपींच्या शोधात आहेत. दरम्यान पीडितेला उपचारासाठी ठाणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची तब्येत स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.