एकतर्फी प्रेमातून भरदिवसा आजीसह चिमुकल्या भावाचा खून, दुहेरी हत्याकांडाने नागपूर हादरलं
एकतर्फी प्रेमातून माथेफिरुने प्रेयसीच्या वृद्ध आजी आणि 10 वर्षांच्या भावाचा जीव घेतला आहे.
नागपूर : एकतर्फी प्रेम किती घातक वळणावर जाऊ शकते आणि वेळीच मुलींना होणाऱ्या त्रासाची पोलिसांकडे तक्रार केली नाही, तर किती भयावह परिणाम होऊ शकतात याची प्रचिती नागपूरात आली आहे. एकतर्फी प्रेमातून माथेफिरुने कथित प्रेयसीच्या वृद्ध आजी आणि 10 वर्षांच्या भावाचा जीव घेतला आहे. दिवसा ढवळ्या 65 वर्षीय लक्ष्मीबाई धुर्वे आणि 10 वर्षाच्या यश धुर्वेच्या हत्येने आज नागपूरात खळबळ माजली आहे..
हजारीपहाड परिसरातल्या कृष्णनगरमध्ये आज दुपारी धुर्वे कुटुंबाच्या तरुण मुलीच्या ( हत्या झालेल्या यशची मोठी बहीण ) मागे लागलेल्या माथेफिरुने धारधार हत्याराने आधी लक्ष्मीबाई आणि नंतर चिमुकला यशची हत्या केली. मिळालेल्या माहितीप्रमाणे गांधीबाग परिसरातला एक तरुण अनेक दिवसांपासून धुर्वे कुटुंबातील तरुण मुलीच्या मागे लागला होता. मेहनत करून कुटुंब चालवणाऱ्या धुर्वे कुटुंबियांनी आपल्या मुलीला समजूत घातली. त्यानंतर तिने त्या तरुणासोबत सर्व संपर्क तोडले होते. तरीही तो तरुण सतत धुर्वे कुटुंब राहत असलेल्या कृष्णानगर भागात यायचा. त्यामुळे ना इलाजाने धुर्वे कुटुंबियांनी आपल्या मुलीला नागपुरातच दुसऱ्या परिसरात राहणाऱ्या मामाच्या घरी पाठवले होते.
आज दुपारी धुर्वे दाम्पत्य आपल्या कामावर गेल्यानंतर घरी लक्ष्मीबाई आणि चिमुकला यश हे दोघेच होते. त्याच वेळी तो तरुण त्या ठिकाणी आला आणि त्याने आपल्या हातातील धारधार शस्त्राने लक्ष्मीबाई आणि यशचा खून केला. शेजाऱ्यांनी धुर्वे यांच्या घरातून आलेल्या आवाजानंतर तिथे जाऊन पाहिले असता दुहेरी हत्याकांडाची ही घटना उघडकीस आली. लगेच घटनेची माहिती धुर्वे दाम्पत्याने पोलिसांना दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, हत्या करणारा तरुण फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. त्याला अटक होईपर्यंत पोलिसांनी त्याचे नाव गुपित ठेवले आहे.