पोलिसांचा खबरी असल्याचा संशय, नक्षलवाद्यांकडून एकाची हत्या
पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षलवाद्यांनी एका व्यक्तीची हत्या केली आहे. एटापल्ली येथील सिनभट्टी गावाबाहेर नेऊन इसरुची हत्या करण्यात आली आहे.
गडचिरोली : पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षलवाद्यांनी एका व्यक्तीची हत्या केली आहे. इसरु पोटावी असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. एटापल्ली तालुक्यातील सिनभट्टी गावाबाहेर नेऊन इसरुची हत्या करण्यात आली.
शनिवारी मध्यरात्री 15 ते 20 नक्षलवाद्यांनी सिनभट्टी गावात जाऊन इसरु पोटावी याला झोपेतून उठवलं आणि अपहरण करुन गावाबाहेर नेलं. त्यानंतर नक्षलवाद्यांनी इसरुची गोळ्या झाडून हत्या केली. हत्या केल्यानंतर नक्षलवाद्यांनी त्याचा मृतदेह रस्त्याच्या बाजुलाच ठेवला होता अशी माहिती समोर येत आहे. कसनसूर दलमच्या नक्षलवाद्यांनी इसरुची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
इसरुच्या हत्येनंतर सिनभट्टी परिसरात दहशत पसरली आहे. पोलिस आणि नक्षलवादी यांच्यात 22 एप्रिलला कसनासूर येथे झालेल्या चकमकीत पोलिसांनी तब्बल 40 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं होतं. या चकमकीनंतर नक्षलवाद्यांनी सामन्य नागरिकाची हत्या केल्याची ही पहिलीच घटना आहे. याच महिन्यात 28 तारखेपासून नक्षलवाद्यांचा शहीद सप्ताह सुरु होत आहे.