25 January In History: मदर तेरेसा आणि विनोबा भावे यांना भारतरत्न, मांढरदेवी चेंगराचेंगरीत 300 जणांचा मृत्यू
On This Day In History : साताऱ्यातील मांढरदेवी यात्रेमध्ये (Mandhardevi Yatra) 25 जानेवारी 2005 साली चेंगराचेंगरी झाली आणि त्यामध्ये 300 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
मुंबई: कुष्ठरोगी आणि अनाथांची सेवा करणाऱ्या मदर टेरेसा आणि थोर स्वातंत्र्यसेनानी आणि भूदान चळवळीचे जनक आचार्य विनोबा भावे या दोन भारतीयांना आजच्याच दिवशी म्हणजे 25 जानेवारी रोजी भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तसेच भूदान चळवळीचे जनक आचार्य विनोबा भावे यांना 1983 साली मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. या घटनांसह आजच्या दिवशी इतिहासात घडलेल्या इतर महत्त्वाच्या घडामोडी खालीलप्रमाणे,
1971- हिमाचल प्रदेशला पूर्ण राज्याचा दर्जा
हिमाचल प्रदेशची स्थापना हिमालयातील 30 पर्वतीय प्रदेशांना एकत्रित करून करण्यात आली. 1 नोव्हेंबर 1966 रोजी पंजाब राज्य अस्तित्वात आले तेव्हा इतर काही संबंधित क्षेत्रे हिमाचलमध्ये विलीन करण्यात आली. 25 जानेवारी 1971 रोजी हिमाचल प्रदेशला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला.
1971: युगांडात लष्करशाही, इदी अमीन यांनी सत्ता ताब्यात घेतली
युगांडाच्या लष्कराचे प्रमुख इदी अमीन यांनी 25 जानेवारी 1971 रोजी लष्करी उठाव करून राष्ट्राध्यक्ष मिल्टन ओबोटे यांच्या लोकशाही सरकारकडून सत्ता हस्तगत केली. युगांडाला 1962 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून ओबोटे हे देशाचे नेतृत्व करत होते. 25 जानेवारी 1971 रोजी, सत्तापालटाच्या वेळी राष्ट्रकुल शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी सिंगापूरमध्ये गेले होते. त्यावेळी लष्करप्रमुख इदी अमीन यांनी सत्ता ताब्यात घेतली.
1980- भारतरत्न पुरस्कार पुन्हा प्रदान करण्यास सुरुवात
देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न हा 1977 सालापासून देण्यात बंद करण्यात आला होता. 25 जानेवारी 1980 पासून हा पुरस्कार पुन्हा देण्यास सुरुवात झाली.
1980- मदर टेरेसा यांना भारतरत्न
कुष्ठरोगी आणि अनाथांची सेवा करणाऱ्या मदर टेरेसा यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना 25 जानेवारी 1980 रोजी भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. देशातील रंजल्या-गांजल्या लोकांची सेवा करण्यासाठी मदर टेरेसा (Mother Teresa) यांनी आपले जीवन समर्पित केलं. त्यांनी भारतात आपल्या कार्याची सुरुवात केली. मदर टेरेसा यांना 7 ऑक्टोबर 1950 रोजी मिशनरी ऑफ चॅरिटी या (Missionaries of Charity) संस्थेची स्थापना करण्यासाठी मान्यता देण्यात आली. मदर टेरेसा यांनी ही संस्था कोलकात्यात स्थापन केली आणि आपल्या समाजकार्याला सुरुवात केली. आज त्यांच्या या संस्थेच्या माध्यमातून देशभरात शेकडो अनाथालयं आणि रुग्णालयं कार्यरत आहेत. या माध्यमातून लाखो लोक त्यांच्याशी जोडले गेले आहेत. मदर टेरेसा यांच्या या कार्याची दखल घेऊन 1979 साली त्यांना शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आला.
1983- विनोबा भावे यांना मरणोत्तर भारतरत्न
विनायक नरहरी भावे उर्फ विनोबा भावे (Vinoba Bhave) यांचा जन्म 11 सप्टेंबर 1895 रोजी रायगड जिल्ह्यातील गगोड या गावी झाला. आचार्य विनोबा भावे एक स्वातंत्र्यसेनानी, समाजसुधारक आणि आध्यात्मिक गुरु होते. महात्मा गांधींच्या विचारसरणीवर त्यांनी आयुष्यभर काम केलं. विनोबांनी अहिंसा आणि समानतेच्या तत्त्वांचे पालन केले. त्यांनी आपले जीवन गरीब आणि दलितांच्या सेवेसाठी समर्पित केले आणि त्यांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढा दिला. विनोबा भावे यांनी भूदान चळवळीची सुरुवात केली. विनोबा भावे यांना त्यांच्या कामाची दखल घेऊन 1958 साली रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय होते. 25 जानेवारी 1983 साली त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आला.
2005- मांढरदेवी यात्रेत चेंगराचेगरी, 300 भाविकांचा मृत्यू
साताऱ्यातील मांढरदेवी यात्रेमध्ये (Mandhardevi Yatra) 25 जानेवारी 2005 रोजी चेंगराचेंगरी झाली होती. त्यामध्ये 300 भाविकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेसाठी महाराष्ट्रातून आणि कर्नाटकातून हजारो भाविक येतात.