25th In History: सुएझ कालव्याची पायाभरणी, ब्लॅक अॅण्ड व्हाईट दूरदर्शन रंगीत झाला; आज इतिहासात...
25th In History: आजचा दिवस आरोग्य जागरुकतेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. आज जागतिक मलेरिया दिवस आहे. जगाच्या अर्थकारणाला नवं वळण देणाऱ्या सुएझ कालव्याची पायाभरणीदेखील आजच्या दिवशी झाली.
25th In History: इतिहासात प्रत्येक दिवसाचे महत्त्व आहे. आज 25 एप्रिल रोजीदेखील इतिहासात काही महत्त्वाच्या घडामोडी झाल्या आहेत. या घडामोडींचा देशाच्या, जगाच्या राजकारणावरही परिणाम झाला. आजचा दिवस आरोग्य जागरुकतेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. आज जागतिक मलेरिया दिवस आहे. मलेरिया आजाराने जगभरात लाखो नागरिकांचा मृत्यू होतो. त्यामुळे मलेरियाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी जागतिक मलेरिया दिवस साजरा केला जातो. जगाच्या अर्थकारणाला नवं वळण देणाऱ्या सुएझ कालव्याची पायाभरणीदेखील आजच्या दिवशी झाली.
जागतिक मलेरिया दिवस: World Malaria Day
25 एप्रिल रोजी जागतिक मलेरिया दिन (World Malaria Day) साजरा केला जातो. जागतिक मलेरिया दिन हा मलेरिया प्रतिबंध, नियंत्रण आणि या आजाराचे निर्मूलन या गोष्टींबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) 2008 मध्ये सर्वप्रथम हा दिवस साजरा केला. मलेरिया हा आजार Plasmodium Parasites मुळे होतो.
1874 : रेडिओचे संशोधक गुग्लिएल्मो मार्कोनी यांचा जन्म
गुग्लिएल्मो मार्कोनी हे इटलीचे संशोधक, भौतिकशास्त्रज्ञ, रेडिओ संशोधक होते. बिनतारी संदेश वहनाच्या संशोधनात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी रेडिओ टेलिग्राफचाही शोध लावला. 1895 मध्ये मार्कोनी यांनी त्यांच्या घराच्या बागेत रेडिओ टेलिग्राफीचे प्रारंभिक प्रयोग सुरू केले. लवकरच एका मैलाच्या अंतरावर कोणत्याही वायरी वगैरेशिवाय रेडिओ सिग्नल पाठवण्यास त्यांना यश मिळाले. पुढील वर्षी त्यांना रेडिओ टेलिग्राफीचे पेटंट मिळाले. त्यानंतर त्यांनी संशोधन विकसित करत रेडिओ तंत्रज्ञान विकसित केले. त्यांच्या संशोधनासाठी त्यांना 1909 मध्ये नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
1859: सुएझ कालव्याची पायाभरणी झाली.
भारत आणि युरोप यांच्यातील अंतर सुएझ कालव्यामुळे कमी झाले. या कालव्याच्या निर्मितीची पायाभरणी 25 एप्रिल 1859 रोजी करण्यात आली. सुएझ कालवा हा 1869 मध्ये वाहतुकीसाठी खुले करण्यात आले. सुएझ कालव्यामुळे युरोप व आशिया या दोन खंडांदरम्यान जलद सागरी वाहतुक शक्य झाली आहे. सुएझ कालवा सुरू होण्यापुर्वी युरोपातुन आशियाकडे जाणाऱ्या बोटींना आफ्रिका खंडाला सुमारे 7000 किमी लांबीचा वळसा घालुन जावे लागत असे.
1982 : ब्लँक अँड व्हाईटमधील दूरदर्शनचे रंगीत प्रक्षेपण
भारतात ब्लँक अॅण्ड व्हाईटमध्ये प्रक्षेपित होणारे प्रक्षेपण रंगीत झाले होते. आजच्या दिवशी पहिल्यांदाच रंगीत प्रक्षेपण करण्यात आले. 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केलेल्या भाषणाचे रंगीत प्रक्षेपण करण्यात आले.
पुढे, याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात भारतात पार पडत असलेल्या एशियाड क्रीडा स्पर्धेचे प्रक्षेपण रंगीत करण्याचा निर्णय झाला होता. ब्लँक अॅण्ड व्हाईटपासून रंगीत प्रक्षेपण होणे ही बाब त्याकाळी प्रचंड लोकप्रिय ठरली. टीव्हीवर प्रक्षेपित होणाऱ्या एशियाडला मोठा प्रतिसाद मिळाला. या रंगीत प्रक्षेपणामुळे टीव्हीची मागणी वाढली होती.
1959 मध्ये दूरदर्शनची स्थापना करण्यात आली होती. त्यावेळी ऑल इंडिया रेडिओचा भाग होता. त्यानंतर दोन्ही विभाग वेगळे करण्यात आले. भारतात टप्प्या-टप्प्याने दूरदर्शनचा विकास झाला. सुरुवातीला दूरदर्शनचे प्रक्षेपण काही तासांसाठी होेत असे. लोकशिक्षणासाठी याचा वापर करण्यात येत होता.
इतर:
1905: दक्षिण आफ्रिकेत कृष्णवर्णियांना मतदानाचा अधिकार मिळाला.
1953 : केंब्रिज विद्यापीठातील जेम्स डी. वॉटसन आणि फ्रान्सिस क्रिक या दोन शास्त्रज्ञांनी डीएनएची रचना स्पष्ट करून जीवशास्त्राच्या एका मूलभूत कोड्याचे उत्तर शोधून काढले. या दोन्ही शास्त्रज्ञांना त्यांच्या शोधासाठी 1962 मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले होते.
1989: श्रीलंकेच्या संसदेने भारतीय वंशाच्या तीन लाख 30 हजार तमिळ जनतेला मताधिकार देण्याचा निर्णय घेतला.