शिर्डीत पहिल्या दिवशी 8 हजार साईभक्तांनी घेतलं दर्शन
लॉकडाऊननंतर सुमारे 8 महिन्यांनी श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले.
शिर्डी : राज्य शासनाच्या घोषणेनंतर काल पहाटेच्या काकड आरतीनंतर श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. पहिल्याच दिवशी दिवसभरात सुमारे 8 हजार 290 साईभक्तांनी सामाजिक अंतराचे पालन करुन साईबाबांच्या समाधीच्या दर्शनाचा लाभ घेतला आहे.
कोरोनाच्या संकटामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाच्या वतीने लॉकडाऊननंतर 17 मार्च पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलेले होते. राज्य शासनाच्या घोषणेनंतर पाडव्याच्या मुहुर्तावर साई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना गेट नंबर 2 मधून प्रवेश देऊन द्वारकामाई मंदिरातून समाधी मंदिरामधून दर्शन घेऊन गुरुस्थान मंदिर मार्गे 5 नंबर गेटद्वारे बाहेर जाणे असा मार्ग उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
लॉकडाऊननंतर सुमारे 8 महिन्यांनी श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले. त्यामुळे भक्तांच्या अतिउत्सहामुळे दिवसभरात आठ हजार 290 साईभक्तांनी सामाजिक अंतराचे पालन करुन श्री साईबाबांच्या समाधीच्या दर्शनाचा लाभ घेतला. तसेच श्री साईप्रसादालयात साईभक्तांकरता भोजन प्रसाद सुरु करण्यात आले. काल दिवसभरात सुमारे 3 हजार साईभक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला असून पहिल्याच दिवशी साईभक्तांव्दारे देणगी कार्यालयात सुमारे 2 लाख 50 हजार रुपये देणगी प्राप्त झाली असल्याची माहिती साई संस्थानने दिली आहे.