(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नितीन राऊत यांनी वीजबिलात सवलत देण्याची घोषणा करताना घाई केली, ती आमची चूक : अशोक चव्हाण
उर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीजबिलात सवलत देण्याची घोषणा करताना घाई केली. पक्षात आणि सरकारमध्ये घोषणा करण्याआधी चर्चा करायला हवी होती, ही आमच्याकडून चूक झाली, अशी कबुली कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
मुंबई : राज्यात वाढीव वीज बिलावरुन विरोधकांनी रान उठवलं आहे. मनसे तर आज राज्यव्यापी आंदोलन करत आहे. अशातचं एक धक्कादायक खुलासा कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. उर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीजबिलात सवलत देण्याची घोषणा करताना घाई केली. त्यांनी पक्षात आणि सरकारमध्ये घोषणा करण्याआधी चर्चा करायला हवी होती. प्रक्रिया फोलो करणं आवश्यक होतं. तसं झालं नाही, ही आमच्याकडून चूक झाली, अशी कबुली मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
तिन्ही वीज कंपन्याही कुणाच्या तरी ग्राहक आहेत. कोरोनाच्या काळात आलेल्या तीन महिन्यांचे वीज देयके कुणाला जास्त आले असेल तर तीन हफ्ते पाडून आणि कुणी एकत्र भरत असेल तर 2 टक्के सवलत देऊ अशा तरतुदी केल्या आहेत. याला पैसा लागतो, पैशाचे सोंग घेता येत नाही. माफीचा निर्णय राज्य सरकारचा आहे. कोरोनामुळे झालेल्या आर्थिक नुकसानामुळे आम्हाला थोडे माघारी यावे लागले, अशी प्रतिक्रिया उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली. संविधान दिनानिमित्त नागपुरातील संविधान चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर ऊर्जा मंत्री नितीन राऊत बोलत होते.
तेलाचे भाव कोसळूनही केंद्राकडून दिलासा नाही : नितीन राऊत
विरोधीपक्ष क्रूड तेलाचे भाव कोसळले तरी त्याच भावाने म्हणजे 85 रुपयाने पेट्रोल विकत आहे. आमच जीएसटीचे 28 हजार कोटी केंद्राकडे अडले आहे, त्यात मदत करत नाही. महापूर, अतिवृष्टीतही केंद्राने मदत केली नाही. माफी द्या म्हणता, तिजोरी तुमच्या काळात खाली झाली. राज्यावर 4 लाख कोटींचे कर्ज भाजप सरकारने करुन ठेवलं आहे, त्याचं काय? असे प्रश्न उर्जामंत्री नितीन राऊत यांनी उपस्थित केले आहेत.
वाढीव वीज बिलाविरोधात मनसेचे राज्यभरात मोर्चे वाढीव वीज बिलाच्या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतली असून आता जनतेला न्याय देण्यासाठी आज संपूर्ण राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोर्चे आयोजित केले आहेत. आज संपूर्ण राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढण्यात येणार आहे. एकाच वेळी संपूर्ण राज्यात निघणाऱ्या या मोर्चामध्ये लाखो लोक सामील होतील असे नियोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आले आहे.
संबंधित बातमी :
मनसेचं राज्यव्यापी आंदोलन; वीज बिल भरू नका, राज ठाकरेंचं जनतेला पत्राद्वारे आवाहन
MNS March against Inflated Power Bills | वीज बिल भरु नका, पत्रातून राज ठाकरेंचं महाराष्ट्राला आवाहन