Nitin Kareer : सनदी अधिकारी डॉ. नितीन करीर राज्याचे नवे मुख्य सचिव, मनोज सौनिक निवृत्त
Nitin Kareer : ज्येष्ठ सनदी अधिकारी डॉ. नितीन करीर यांची राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Maharashtra Chief Secretary : सनदी अधिकारी डॉ. नितीन करीर (Dr. Nitin Kareer) यांची महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे मावळते मुख्य सचिव मनोज सौनिक हे निवृत्त झाले आहे. राज्य सरकारने सौनिक यांचा कार्यकाळ वाढवण्याची विनंती केंद्राला केली होती. मात्र, त्यावर केंद्र सरकारने निर्णय घेतला नाही. सौनिक यांनी राज्याचे मुख्य सचिव म्हणून 30 एप्रिल ते 31 डिसेंबर या कार्यकाळात जबाबदारी सांभाळली.
राज्याचे नवे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर हे 1988 च्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत. त्यांचा कालावधी हा 31 मार्च 2024 पर्यंत असणार आहे. त्यांच्या निवृत्तीनंतर सनदी अधिकारी सुजाता सौनिक यांना मुख्य सचिव म्हणून जबाबदारी पार पाडण्याची संधी मिळू शकते.
राज्याचे नवे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर हे वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत होते. आता मुख्य सचिव म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत. डॉ. नितीन करीर यांनी मावळते मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्याकडून सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास पदभार स्वीकारला. नितीन करीर यांची सेवानिवृत्ती 31 मार्च रोजी होणार आहे. मात्र, त्याच दरम्यान लोकसभा निवडणुका असल्याने त्यांना मुदतवाढ मिळणार का, याकडेही लक्ष लागले आहे.
डॉ. करीर यांनी यापूर्वी महसूल आणि वने तसेच नगर विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहिले आहे. डॉ. करीर यांनी एमबीबीएस पदवी घेतली. त्यांची 1988 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाली. त्यानंतर त्यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी सांगली, पुणे जिल्हाधिकारी म्हणून काम केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालक, नोंदणी महानिरीक्षक, पुणे महापालिकेचे आयुक्त, पुणे विभागीय आयुक्त अशा विविध पदांची जबाबदारी सांभाळली आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, विक्रीकर आयुक्त, जमाबंदी आयुक्त या पदावरही काम केले आहे.