LIVE UPDATES | राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस, शेतकऱ्यांचं नुकसान
दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये... शहराचे नामांतर हा महाविकास आघाडीचा कार्यक्रम नाही : बाळासाहेब थोरात टीआरपी केसमध्ये मुंबई पोलिसांच्या हाती आता सबळ पुरावे : राज्य सरकार मुंबई पोलीस सायबर सेलकडून 'जामतारा' घोटाळा उघड; सहा आरोपी गजाआड काळुबाईचे मंदिर एक महिना बंद, यात्रेसह पै पाहुण्यांवरही बंदी
LIVE
Background
दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
शहराचे नामांतर हा महाविकास आघाडीचा कार्यक्रम नाही : बाळासाहेब थोरात
महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते आहे. भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने (@MahaDGIPR) शहरांचे परस्पर नामांतरण करू नये, सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचे भान बाळगावे. शहरांचे नामांतरण करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही. छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या नावाचा वापर करून नामांतराचे राजकारण खेळू नये, आपण सर्व मिळून औरंगाबादच्या विकासासाठी काम करूया, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं.
टीआरपी केसमध्ये मुंबई पोलिसांच्या हाती आता सबळ पुरावे : राज्य सरकार
टीआरपी घोटाळ्यासंदर्भात पुढील सुनावणी होईपर्यंत रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि त्यांच्या संस्थेतील इतर कर्मचाऱ्यांवर कोणतीही कठोर कारवाई करणार नसल्याचं राज्य सरकारने बुधवारी (6 जानेवारी) मुंबई उच्च न्यायालयात सांगितलं. त्याची दखल घेत हायकोर्टानं अर्णब गोस्वामी आणि एआरजी मीडियाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेला अंतरिम दिलासा पुढील सुनावणीपर्यंत कायम ठेवला आहे. मात्र, या प्रकरणात संबंधितांविरोधात आता सबळ पुरावे मिळाल्यामुळे पुढील सुनावणीनंतर कारवाई न करण्याबाबत कोणतीही ग्वाही देण्याच्या विचारात मुंबई पोलीस नाही. आज वकील नसल्याने पुढील सुनावणीपर्यंतच आम्ही वेळ देऊ शकतो असे राज्य सरकारच्यावतीने बाजू मांडताना ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी हायकोर्टाला सांगितलं.
मुंबई पोलीस सायबर सेलकडून 'जामतारा' घोटाळा उघड; सहा आरोपी गजाआड
मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं केलेल्या कारवाई दरम्यान लोकांची फसवणूक करणाऱ्या एका टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. ही टोळी एचपी गॅसची एजन्सी मिळवून देण्याची बतावणी करून बनावट वेबसाइट बनवून त्याद्वारे विविध राज्यातील लोकांची फसवणूक करत होती. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सहा आरोपींना अटक केली आहे. यामध्ये पाच पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. देशभरातील 10 हजार नागरिकांना या टोळीने लुबाडल्याचं तपासादरम्यान निष्पन्न झालं आहे. या आरोपींनी वेबसाइटवरून देशातील वेगळ्या राज्यातील नागरिकांना गॅस एजन्सी देण्याचे अमिष दाखवून अनेकांनी फसवणूक केली. बिहार ,पश्चिम बंगाल राज्यातून हे रॅकेट चालवण्यात येत असल्याचं मुंबई पोलिसांच्या सायबर सेलला माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी यासंदर्भात कारवाई केली आहे.
काळुबाईचे मंदिर एक महिना बंद, यात्रेसह पै पाहुण्यांवरही बंदी
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील प्रचलित असलेल्या मांढरदेवी गडावरील काळुबाईची यात्रा यंदा रद्द करण्यात आली असून 13 जानेवारी ते 13 फेबुवारी पर्यंत मंदिरही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या पाश्वभुमीवर प्रशासकिय यंत्रणेकडून काळजी घेतली जात असताना आज सातारा जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यात्रेदरम्यान देवस्थानचे ट्रस्टी, मंदिर पुजारी व ग्रामस्थ अशा मोजक्याच भाविकांनी मंदिराचे पुजन करण्याच्या या बैठकित प्रशाकिय यंत्रणेकडून सुचना देण्यात आल्या आहेत. साता-यातील मांढरदेव गडावरील काळुबाई देवीची यात्रा मोठी प्रचलित आहे. या यात्रेला महाराष्ट्रासह इतर राज्यातील लाखो भाविक गडावर देवीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार गडावर सुमारे 8 लाख भाविकांनी हजेरी लावली होती.