शेतकऱ्यांसमोर नवं संकट, जनावरांना 'लंपी' रोगाची लागण, काय आहेत लक्षणं आणि उपाय
महाराष्ट्र-गुजरातच्या सीमावर्ती भागात गुरांना लंपी या आजाराची लागण झाली आहे. जनावरांमध्येही साथीचा आजार आल्याने शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
नंदुरबार: महाराष्ट्र-गुजरातच्या सीमावर्ती भागात गुरांना लंपी या आजाराची लागण झाली आहे. जनावरांमध्येही साथीचा आजार आल्याने शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी पशुवैद्यकीय विभागाकडे उपचारासाठी मागणी करूनही पशुवैद्यकीय विभाग दुर्लक्ष करत असल्याचे समोर आले आहे.
गुजरात राज्यात लंपी त्वचा रोगाची लागण सर्वात प्रथम झाली होती. त्यानंतर हा आजार गुजरातच्या सीमावर्ती भागात असलेल्या महाराष्ट्र मधील तालुक्यांमध्ये आढळून येऊ लागला आहे. या आजारात जनावरांना आधी ताप येतो त्यानंतर अंगावर गाठी येणे, सूज येणे, फोड होणे अशी लक्षणे दिसून येतात या आजारामुळे जनावरे बेजार झाले असून या आजाराची लक्षणे ज्या पशुधनाला दिसून येत आहे. त्यांना इतर जनावरांपासून दूर ठेवावे असा सल्ला गुजरात राज्यातील सेवानिवृत्त पशुधन निरीक्षक शरद चौधरी यांनी दिला आहे.
जनावरांच्या शरीरावर गाठ येणे, ताप येणे, चारा न खाणे, नाकातून आणि डोळ्यातून पाणी गळणे अशी लक्षणे जनावरांमध्ये दिसून येत असून पशु मालकांनी शासकीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची वारंवार संपर्क साधला तरी पशुवैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात या विषाणूजन्य आजाराचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असून पशुधन मालक त्रस्त झाले आहेत. पशुसंवर्धन विभागाची वारंवार संपर्क साधूनही कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केले आहे.
पशुधन आधीच कमी होत असले, तरी आजही ग्रामीण भागात जनावरांची संख्या चांगली आहे.नवापूर तालुक्यातील बहुतांशी भागात लंपी आजाराने थैमान घातले आहे. जनावरांच्या दूध उत्पादनावरही याचा परिणाम होत आहे. खरीप हंगामाच्या दिवसांत गुरांना झालेली ही बाधा शेतकऱ्यांच्या जिव्हारी लागत असून नाइलाजाने अनेकांना यांत्रिकी शेतीचा आधार घेऊन पैसे खर्च करावे लागत असल्याचे चित्र आहे. असे असले तरी पशुधन विभाग मात्र अपूर्ण कर्मचारी वर्गामुळे गुरांना उपचार करण्यास विलंब लावत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. .
सध्या या आजाराचे प्रमाण वाढले आहे.या आजारामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडलेली आहे.या आजारात जनावरांना ताप येतो.जनावरांच्या पूर्ण शरीरावर गाठी येतात.सुखद बाब म्हणजे या आजारात जनावर दगावण्याची शक्यता नाही सारखीच आहे.नवापूर तालुक्यात सर्वत्र या आजाराने थैमान घातले आहे.सध्या तरी या आजारावर इलाज बाजारात उपलब्ध झालेला नाही. मात्र सर्व ठिकाणाहून या आजाराच्या तक्रारी येत आहेत.तेंव्हा पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याकडे जातीने लक्ष देऊन शेतकऱ्यांवरील हे संकट दूर करावे अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे. राज्य सरकारने सर्वेक्षण करून मोफत उपचार करून लसीकरण करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.