(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नेपाळ बस दुर्घटना : मंत्री रक्षा खडसेंनी काठमांडूला पोहोचत केली अधिकाऱ्यांशी चर्चा, आज विशेष विमानाने मृतदेह महाराष्ट्रात आणणार
Nepal Bus Accident : नेपाळला दर्शनासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील यात्रेकरुंच्या बसला अपघात झालाय. यात काही जण जळगावच्या भुसावळ तालुक्यातल्या वरणगाव परिसरातले आहेत.
मुंबई : नेपाळला दर्शनासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील यात्रेकरुंच्या बसला अपघात (Nepal Bus Accident) झालाय. बस नदीत कोसळल्याने 27 जणांचा मृत्यू झालाय तर काही जण जखमी झाले आहेत. बसमध्ये एकूण 40 जण होते. नेपाळमधल्या पोखरा शहराकडून काठमांडूला जाताना हा अपघात झाला आहे. मृतांमध्ये काही जण जळगावच्या भुसावळ (Bhusawal) तालुक्यातल्या वरणगाव परिसरातले आहेत. या बस दुर्घटनेनंतर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) आणि आमदार संजय सावकारे (Sanjay Sawkare) हे नेपाळमध्ये दाखल झाले असून जखमींवर तातडीने उपचारासह मृतदेह भारतात परत आणण्यासाठी त्या प्रयत्न करत आहेत.
नेपाळ बस दुर्घटनेमध्ये जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगाव, तळवेल या गावातील 24 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितले जात आहे. अयोध्या येथील राम मंदिर दर्शनानंतर भुसावळ तालुक्यातील 80 प्रवासी हे नेपाळ दर्शन सफारीसाठी निघाले होते. काठमांडूतून या बस जात असताना एक बस नदीत कोसळून मोठा अपघात झाला होता. अपघात झालेल्या बसमध्ये एकूण चाळीस प्रवासी होते. त्यापैकी किती बचावले याचा निश्चित आकडा कळू शकला नव्हता. मात्र चोवीस जणांचे मृतदेह नेपाळ येथील बचाव पथकाला नदीतून काढण्यात यश मिळाले होते.
रक्षा खडसे यांनी घेतला अधिकाऱ्यांकडून आढावा
या मृतदेहांपैकी अनेकांची ओळख पटू शकलेली नाही. नातेवाईकांच्यामध्ये आपल्या परिजनांनाच्या सुरक्षेविषयी प्रश्न निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री रक्षा खडसे, आ संजय सावकारे आणि अमोल जावळे हे नेपाळकडे रवाना होऊन काठमांडू येथे दाखल झाले आहेत. भारतीय राजदूत नवीन श्रीवास्तव आणि नेपाळच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सहसचिव श्री ब्रिघू ढुंगाना यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली आहे. घटनास्थळावरून तातडीने बचावकार्य पाहणी करण्यासोबत ते मृतदेह भारतात आणण्यासाठी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. आज भारतीय लष्कराच्या विमानाने हे मृतदेह नाशिक विमानतळावर आणले जाणार असून त्यानंतर ते त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केले जाणार आहेत.
हेल्पलाइन नंबर जारी
नेपाळमध्ये भारतीय पर्यटकांच्या बसला झालेल्या अपघाताबाबत माहिती मिळवण्यासाठी काठमांडू स्थित भारतीय दूतावासाने हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. दूतावासाच्या अधिकृत एक्स अकाउंटवर हा नंबर जारी करण्यात आला आहे. या संदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती मिळवण्यासाठी +9779851107021 जारी केलेला हेल्पलाइन नंबर आहे.
आणखी वाचा