Nepal Bus accident : वडिलांच्या निधनानंतर ज्यांनी सांभाळलं ते काकाही गेले; आई, भावासह एकाच कुुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
नेपाळमधील बस (Nepal bus) दुर्घटनेत जावळे कुटुंब नेपाळमध्ये ज्या बसने (Bus accident) प्रवास करत होते, त्या बसचा नदीमधे पडून झालेल्या अपघातात मृत्यू झाला आहे.
जळगाव : नेपाळ बस दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील 27 जणांचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली असून आज सर्वांचे मृतदेह वायू दलाच्या विमानाने जळगावात दाखल झाले. त्यानंतर, 26 अॅम्ब्युलन्समधून हे मृतदेह त्याच्या मूळगावी नेण्यात आले आहेत. या दुर्घटनेत भुसावळ तालुक्याच्या वरणगाव येथील योगेश जावळे यांच्या कुटुंबातील 4 सदस्यांचा मृत्यू झाल्याने या परिवाराला मोठा धक्का बसला आहे. योगेश जावळे हे शेतकरी कुटुंबातील असून शेतीवरच त्यांचा उदरनिर्वाह होता, त्यांचे काका सुधाकर जावळे आणि योगेश जावळे हे एकाच घरात एकत्र कुटुंब पद्धतीत राहत होते. 16 ऑगस्ट रोजी त्यांचे काका सुधाकर जावळे आणि काकू रोहिणी सुधाकर जावळे, आई विजया कडू जावळे, भाऊ सागर कडू जावळे हे चार जण नेपाळ दर्शनासाठी गेले होते. मात्र, त्यांचा हा नेपाळदर्शन दौरा जावळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळवणारा ठरला.
नेपाळमधील बस (Nepal bus) दुर्घटनेत जावळे कुटुंब नेपाळमध्ये ज्या बसने (Bus accident) प्रवास करत होते, त्या बसचा नदीमधे पडून झालेल्या अपघातात मृत्यू झाला आहे. या एकाच कुटुंबातील चारही जणांचा मृत्यू झाल्याने जावळे परिवार पूर्णपणे दुःखाच्या खाईत लोटला गेला आहे. जावळे कुटुंबातील चार प्रमुख सदस्य गेल्याने आम्हाला आता जगाचे कसे असा प्रश्न डोळ्यातील अश्रूंसोबतच योगेश जावळेंकडून विचारला जात आहे. योगेश जावळे यांचे वडील 19 वर्षाच्या पूर्वी आजाराने मयत झाले होते, त्यानंतर त्यांचे काका सुधाकर जावळे यांनी त्यांना आपल्या मुलांप्रमाणे सांभाळले. शेतीसह आईला वडिलांची मिळणारी पेन्शन याचा त्यांना मोठा आर्थिक आधार होता. मात्र, आता त्यांचा हा आधारदेखील तुटला असल्याने, घराचा सांभाळ करण्याच्या जबाबदारीसह कुटुंबाला आर्थिक पाठबळ देण्याची जबाबदारी देखील आपल्यावर पडली असल्याचं योगेश जावळे यांनी म्हटलं. या जबाबदारीपेक्षा जवळची माणसं गेल्याचं मोठं दु:ख जावळे कुटुंबीयांवर आहे. दरम्यान, जळगावच्या (Jalgaon) वरणगाव येथील जावळे परिवारातील मृत सुधाकर जावळे हे शेतीसह भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते राहिले असल्याने त्यांचा या भागात मोठा जनसंपर्क होता. त्यांच्या जाण्याने या परिसरात शोककळा पसरली आहे.
26 ॲम्बुलन्समधून मृतदेह गावी
देवदर्शनासाठी भाविक नेपाळ येथील काठमांडू येथे जात असताना ही बस दरीत कोसळली होती. त्या भाविकांचा बस अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह हे जळगाव विमानतळ येथे दाखल होणार होते. हे मृतदेह आणण्यासाठी 26 ॲम्बुलन्सचा ताफा दाखल झाला होता. त्यांच्यासोबत केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे , आमदार संजय सावकारे हे देखील आहेत. हे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार असून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.