(Source: ECI/ABP News/ABP Majha)
संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर 15 जुलैपासून नदीकाठी एनडीआरएफ पथके तैनात होणार
पुराच्या पार्श्वभूमीवर 15 जुलैपासुन नदीकाठी एनडीआरएफ पथके तैनात होणार आहेत. पुराच्या अनुषंगाने महाराष्ट्र-कर्नाटकमध्ये समन्वय ठेवणार असल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. सांगलीमध्ये आयोजित सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील पूरस्थिती आढावा बैठक प्रसंगी बोलत ते होते.
सांगली : संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन नदीकाठी 15 जुलैपासून एनडीआरएफची पथके तैनात होणार आहे. अलमट्टी धरणातून पाणी विसर्ग नियोजनाबाबत पुढील आठवड्यात कर्नाटक सरकारशी चर्चा करण्यात येणार असल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. तसेच वडनेरे समिती आणि लोकप्रतिनिधी यांनी सुचवलेल्या उपायानुसार काम केले जाईल, असा विश्वासही मंत्री पाटील यांनी व्यक्त केला आहे. सांगलीमध्ये आयोजित सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील पूरस्थिती आढावा बैठक प्रसंगी बोलत ते होते.
संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर आपत्ती नियोजन आणि वडनेरे समिती अहवाल बाबत सांगलीमध्ये आज सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह तिन्ही जिल्ह्यातील आमदार, खासदार व लोकप्रतिनिधी या बैठकीला उपस्थित आहेत. त्याचबरोबर वडनेरे समितीचे सदस्य सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत.
वडनेरे समितीच्या अहवालानुसार काम करणार पहिल्यांदा संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर नियोजन बाबत चर्चा पार पडली. त्यानंतर गतवर्षी आलेल्या महापुराच्या कारणांचा शोध घेण्यासाठी राज्य सरकारने गठीत केलेल्या वडनेरे समितीच्या अहवालावर चर्चा पार पडली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत जलसंपदा मंत्री यांनी बोलताना संभाव्य पुराच्या दृष्टीने सर्व तयारी करण्यात आली आहे. बऱ्याच वर्षांपासून महाराष्ट्र, कर्नाटक मधील पूरस्थितीवर अभ्यास सुरू आहे. गत वर्षी आलेल्या पुरांचा शोध घेण्यासाठी सरकारने नेमलेल्या वडनेरे समितीचा अहवाल सरकारला मिळाला आहे, हा अहवाल स्वीकारण्यासाठी वेळ लागेल. मात्र, या अहवालानुसार सरकार काम करणार, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. त्याच बरोबर संभाव्य पूर स्थितीबाबत प्रशासनाकडून सर्व पातळ्यांवर नियोजन करण्यात आले.
नदीकाठी 15 जुलैपासून एनडीआरएफची पथके तैनात नदीकाठी 15 जुलैपासून एनडीआरएफची पथके तैनात होणार आहेत. तर नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे महापुराची भीती नागरिकांमध्ये आहे. नागरिकांना घाबरुन जाऊ नये, सरकार त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास मंत्री पाटील यांनी व्यक्त केला. तसेच पावसाळ्यात पुराच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्याशी चर्चा सुरू करण्यात येणार आहे. अलमट्टी धरणातून पाण्याच्या विसर्गाबाबत लवकरच कर्नाटक राज्य सरकारशी चर्चा सुरू होणार आहे, याबाबत बेळगावला आपण जाऊ, असा विश्वासही व्यक्त केला.
वडनेरे समितीच्या अहवालातील सुचनांच्या अनुषंगाने पूरनियंत्रणाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांचा सर्व समावेशक बृहत आराखडा तात्काळ तयार करा, अशी सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली. कृष्णा खोऱ्यातील 2019 मध्ये उद्भवलेल्या पूर परिस्थितीची आधुनिक तंत्रज्ञानाव्दारे विश्लेषण करुन कारणे शोधणे, तांत्रिक उपाययोजना व धोरणे सुचविणे इत्यादी बाबत शासनाने नेमलेल्या तज्ज्ञांच्या अभ्यास समितीच्या अहवालाचे सादरीकरण करण्यात आले.
जिल्ह्यात आपत्तकालीन व्यवस्था सज्ज सांगली, कोल्हापूर शहरातील पूर परिस्थिती नियंत्रणासाठी वडनेरे समितीने सुचविलेल्या विविध उपाययोजनांचा महापालिकांनी बृहतआराखडा तयार करावा. यासाठी विशेष समिती गठीत करून तसा अहवाल तयार करण्याची सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली. पूराच्या अनुषंगाने महाराष्ट्र-कर्नाटकमध्ये समन्वय ठेवणार आहे. आगामी काळात सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगाने महाराष्ट्र - कर्नाटक सरकारमध्ये योग्य समन्वय ठेवण्यासाठी लवकरच महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री व कर्नाटक राज्याचे जलसंपदा मंत्री यांची कोल्हापूर अथवा बेळगावमध्ये सोयीने विशेष बैठक आयोजित केली जाईल, असे सांगून जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले. संभाव्य पूर नियंत्रणासाठी तिन्ही जिल्ह्यात आपत्तकालीन व्यवस्था सज्ज आणि सतर्क केली आहे. पूर नियंत्रणासाठी लागणारी सर्व साधने आणि सुविधा प्राधान्यक्रमाने उपलब्ध करुन देण्याचे नियोजन झाले आहे.
Sangli Flood Preparation | पूर परिस्थितीसाठी सांगली पालिकेचा आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार! स्पेशल रिपोर्ट