(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nawab Malik : नवाब मलिकांच्या खात्याची जबाबदारी इतर मंत्र्यांकडे देण्यासंदर्भातील प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर?
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याकडील खात्याची जबाबदारी इतर मंत्र्यांकडे देण्यासंदर्भातील प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर करण्यात आल्याची सुत्रांकडून माहिती मिळाली आहे.
Nawab Malik : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याकडे असलेल्या खात्याची जबाबदारी इतर मंत्र्यांकडे देण्यासंदर्भातील प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर करण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी रोजी ईडीने अटक केली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे असलेल्या खात्यांची जबाबदारी इतर नेत्यांकडे सोपण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आला आहे.
नवाब मलिक यांच्याकडील अल्पसंख्यांक मंत्रीपदाची जबाबदारी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर कौशल्य विकास मंत्रीपदाचा कार्यभार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे देण्यात आला आहे. परभणीचे पालकमंत्री पद धनंजय मुंडे यांच्याकडे तर प्राजक्त तनपुरे यांच्याकडे गोंदियाचे पालकमंत्री पद देण्यात येणार आहे. तसेच मुंबई अध्यक्षपदाचा कार्यभारही महापालिकेच्या गटनेत्या राखी जाधव आणि नरेंद्र राणेंकडे सोपवण्यात आला आहे.
दरम्यान, नवाब मलिक यांचा अद्याप राजीनामा घेण्यात आला नाही. परंतु, त्यांच्याकडील मंत्रीपदाची जबाबदारी इतर नेत्यांकडे सोपवण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या या प्रस्तावावर मुख्यमंत्री आज निर्णय घेण्याची शक्यता असल्याची माहितीही सुत्रांनी दिली आहे.
ईडीने अटक केल्यानंतर विरोधकांनी सातत्याने नवाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. परंतु, खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा घेणार नसल्याचं जाहीर केलं आणि राजीनाम्याच्या चर्चांवर पडदा पडल्याचं पाहिला मिळालं होतं.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधकांनी दररोज नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. शिवाय त्यांच्याकडे असणाऱ्या खात्यातील कामे कशी होणार? असा प्रश्न उपस्थित केला होता. विरोधकांकडून सातत्याने होणाऱ्या मागणीमुळे अखेर शरद पवार यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली आणि नवाब मलिक यांच्याकडे असणाऱ्या खात्यांचे आणि जबाबदाऱ्यांचं वाटप करून नवाब मलिक यांचं मंत्रिपद कायम ठेवलं आहे.
महत्वाच्या बातम्या