(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अनिल देशमुखांवरील कारवाईनंतर शरद पवार म्हणाले, हा तर राजकीय विचार मान्य नसलेल्यांवर दबाव आणण्याचा प्रकार
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील कारवाईबाबत बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar On Anil Deshmukh) यांनी म्हटलं आहे की, अनिल देशमुखांवरील ईडीचे छापे या गोष्टी नवीन नाहीत. याबाबत अधिक चिंता वाटत नाही.
पुणे : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने छापे टाकले आहेत. सकाळपासून त्यांच्या घरात झाडाझडती करण्यात आली. या कारवाईबाबत बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटलं आहे की, अनिल देशमुखांवरील ईडीचे छापे या गोष्टी नवीन नाहीत. याबाबत अधिक चिंता वाटत नाही. अनिल देशमुख यांच्या कुटुंबाला यापूर्वी देखील यंत्रणेद्वारे त्रास दिला गेला आहे. आणखी कुठे त्रास देता येईल का? असे प्रयत्न सुरू आहेत, असं पवार म्हणाले.
शरद पवार म्हणाले की, सार्वजनिक जीवनातल्या एखाद्या राजकीय नेत्याबाबत दुसऱ्या एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याने ठराव करण्याचे यापूर्वी कधी पाहिले नव्हते. चंद्रकांत पाटील हे कर्तृत्वावान गृहस्थ आहेत. आम्हाला यात काही आश्चर्य वाटत नाही, असा टोलाही पवारांनी लगावला. जो राजकीय विचार आपल्याला मान्य नाही त्यांच्यावर दबाव आणण्याचा हा प्रकार आहे, असं पवार म्हणाले.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील घरात ईडीचे छापे
पवार म्हणाले की, हे आता नवीन नाही महाराष्ट्र आणि इतर राज्यात सुरू केले आहे. केंद्रात हे सरकार आल्यापासून असे हे पाहायला मिळत आहे. मला काही चिंता वाटत नाही. लोकही त्याला गांभीर्याने घेत नाहीत, असं ते म्हणाले. प्रशांत किशोर यांच्याशी झालेल्या बैठकांबाबत ते म्हणाले की, प्रशांत किशोर यांच्या बैठकीबाबत गैरसमज मीडियातून आला. प्रशांत किशोर यांच्यांसोबत दिल्लीतील बैठक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर झाली.
मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना पवार म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा निघावा याची काळजी केंद्र आणि राज्य सरकारने घ्यावी. केंद्राने यासाठी पुढाकार घ्यावा, असं ते म्हणाले.
सामुदायिक आघाडीचे नेतृत्व तुम्ही करणार का?
सामुदायिक आघाडीचे नेतृत्व तुम्ही करणार का? असा प्रश्न त्यांना केला असता ते म्हणाले की, असले उद्योग मी खूप केलेत. आता वेळ इतरांना मार्गदर्शन करण्याची आहे. काँग्रेसला घेऊनच आघाडीचा विचार करावा लागेल असं माझं वैयक्तिक मत आहे. भाजपच्या विरुद्ध सामुदायिक नेतृत्व उभं करावं लागेल, असं पवार म्हणाले.