राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे यांची ग्रामपंचायत शिपायास मारहाण, गुन्हा दाखल
राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी ग्रामपंचायत शिपायास मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.
अहमदनगर : राष्ट्रवादीचे आमदाराने ग्रामपंचायत कार्यालयातील शिपायास रस्त्यावर मारहाण केल्याचा अदखलपात्र गुन्हा अकोले तालुक्यातील राजूर पोलीस ठाण्यात नोंदवला गेला आहे. अकोले विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.
अकोले तालुक्यातील खडकी बुद्रुक येथे काल दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास तक्रादार रामदास बांडे आपल्या गावात दत्त मंदिराजवळ पायी जात होते. मागून आमदार डॉ . किरण लहामटे यांची गाडी जोरात येऊन कट मारून गेली. त्यावेळी पर्यटक आहेत म्हणून गाडी हळू चालवा असे ओरडून बांडे यांनी सांगितले. त्या गोष्टीचा राग आल्याने आमदार किरण लहामटे गाडी थांबवून गाडीच्या खाली उतरले आणि मला ओळखले का मी कोण आहे असे म्हणून त्यांनी माझ्या पोटात व छातीत लाथ मारून मला शिवीगाळ केली व गाडीत बसून निघून गेले असल्याची तक्रार शिपाई रामदास बांडे यांनी दिली आहे. या तक्रारीवरून राजूर पोलिसांनी आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या विरोधात भादंवि 504, 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेचे तालुक्यात प्रतिसाद उमटले असून भाजपचे तालुका अध्यक्ष सीताराम भांगरे यांनी या घटनेचा निषेध करून चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान या घटनेविषयी आमदार लहामटे यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कॅमेरा समोर बोलण्यास नकार दिला. फोनवर बोलताना त्यांनी मारहाण केली नसल्याचं सांगत रामदास बांडे यांनीच मला शिवीगाळ केली असल्याचा आरोप केला आहे.