(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aurangabad : चंद्रकांतदादा, उचलली जीभ लावली टाळ्याला असं करु नका, अजित पवारांचा हल्लाबोल
Aurangabad Latest News : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आरोपाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले आहे.
Aurangabad Latest News : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आरोपाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले आहे. गुरुवारी पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होता, त्यावेळी अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी सवाध साधला. यावेळी बोलताना अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांचे आरोप, सोमय्या यांच्यावरील हल्ला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आरोपाला उत्तर दिले. अजित पवार म्हणाले की, ‘एका महत्त्वाच्या पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष आहेत (चंद्रकांत पाटील), जबाबदार मंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. ते जे आरोप करतायत त्याचे पुरावे द्यावे. बिनबुडाचे आरोप करणे चुकीचे आहे. हेलिकॉप्टरमधून मी जमीनी बघत असतो असं ते म्हणतात, पण हेलिकॉप्टरने फिरायला परवानगी घ्यावी लागते, किती प्रवासी असतात त्यांची माहिती द्यावी लागते. त्यांनी सांगावं मी कधी असं खास हेलिकॉप्टर घेऊन गेलो होतो. उगीच उचलली जीभ लावली टाळ्याला असं त्यांनी करू नये.’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा समाचार -
महाराष्ट्राचे कोरोनाचे काम कसं झाले, ते सगळ्यांनी पाहिलं आहे. राज्याच्या कामाचे न्यायव्यवस्थेनेही कौतुक केलं आहे. दाट लोकवस्तीची शहरे आहेत, धारावीत कोरोनाचे संकट आटोक्यात आणणे आव्हानात्मक काम होते. तरीही विविध मार्गाने आम्ही कोरानाचे सावट आटोक्यात आणले. पण काही जण राजकीय भूमिकेतून बोलतात. शरद पवार साहेब अशी संकटे येतात तेव्हा राजकीय भूमिका बाजूला ठेवून मदतीला धावतात. रेल्वे ज्या सुटल्या त्या गुजरातमधून किती सुटल्या, दुसर्या राज्यातून किती सुटल्या ते बघावे. त्यांच्या पक्षाचे लोक रेल्वे मंत्री पियुष गोयल यांचे रेल्वे सोडल्याबद्दल आभार का मानले आहेत. मजुरांची आपण व्यवस्था केली होती, पण त्यांना त्यांच्या गावी जायचे होते. त्यामुळे त्यांची व्यवस्था करावी लागली, असे अजित पवार म्हणाले.
सोमय्याच्या पुणे दौऱ्यावर काय म्हणाले?
दिल्लीची टीम पुण्यात येऊन त्यांनी पुणे पोलीसांबरोबर चर्चा केली. काय घडलं, कसं घडलं याची माहिती घेतली आहे. राज्यातील पोलीसांची जबाबदारी आहे, कुणाला काही त्रास होणार नाही. तसंच राज्यात काही झालं, तर केंद्रीय गृहविभाग माहिती घेत असतो, असे यावेळी अजित पवार म्हणाले.
सर्वधर्मसमभाव –
धर्मा धर्मांत तेढ निर्माण होणार नाही, याची काळजी राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे. सर्वधर्मसमभाव आहे. घटनेत काय लिहिलंय याचं आत्मचिंतन करायला पाहिजे. आपल्या कृतीतून वातावरण खराब होऊ नये, याची काळजी घ्यायला हवी. पण दुर्दैवाने काही जण राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी केली जाते. कुठल्याही जाती धर्मात एकमेकांचा विरोध करणं, अनादर करणे हे भारतीय संस्कृतीत नाही, आणि घटनेतही नाही, असे वक्तव्य कर्नाटकमधील हिजाब प्रकरणावर अजित पवार यांनी व्यक्त केले.
विदर्भात अधिवेशन घेऊन तिथले प्रश्न सोडवू -
बुधवारी मंत्रीमंडळ बैठकीत अधिवेशनाचा विषय आला होता. राज्यपालांचे अभिभाषण होत असते, त्यासाठी तिथे मोठं सभागृह नाही. हिवाळी अधिवेशन आपण पाच दिवसात संपवले आणि त्यानंतर 50 ते 60 आमदार पॉझिटिव्ह आले. तसेच अनेक अधिकारीही पॉझिटिव्ह आढळले. पुढच्या काळात विदर्भात अधिवेशन घेऊन तिथले प्रश्न सोडवू. शिक्षक मला भेटले परीक्षांवर बहिष्कार टाकणार अशी भूमिका होती. परीक्षा घेण्याची वेळ आलीय आता कात्रीत पकडू नका. लोकांचा समज होईल हे फक्त स्वतःचे हित बघतात, पण आमच्या पाल्यांचा विचार करत नाहीत. मी त्यांना तसं सांगितलं आहे, ते आपल्या संघटनांशी चर्चा करून निर्णय घेणार आहेत, असे अजित पवार म्हणाले.
28 जणांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश -
महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इनकमिंग सुरु झाले आहे. गुरुवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत 28 जणांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूरचे काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष संजय जाधव आणि पक्षाच्या पाच नगरसेवकांसह बाजार समितीचे माजी संचालकांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.