Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांची सिधी बात, म्हणाले, अजित पवारांना अध्यक्ष कुणी केलं?
Jitendra Awhad On Ajit Pawar : शरद पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी निवडणूक घेण्यात आली होती, त्याची सर्व कागदपत्रं ही निवडणूक आयोगाकडे सोपवण्यात आली आहेत असं आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले.
मुंबई: अजित पवारांना (Ajit Pawar) राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून कोण नेमलं, त्यांना पाठिंबा कोण दिला? त्याचे काही पुरावे आहेत का? अशा प्रश्नांची सरबत्ती आज राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केली. विधीमंडळ पक्ष हा राजकीय पक्ष नाही, विधीमंडळात निवडून येणारे सदस्य हे राजकीय पक्षाचे घटक असल्याचं सांगत सोमवारची पत्रकार परिषद ही खोटं कसं खरं आहे असं सांगण्यासाठी होती असा टोलाही त्यांनी लगावला.
Jitendra Awhad On Ajit Pawar : अजित पवारांना अध्यक्ष कोण केलं?
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून पक्षाचे अध्यक्ष हे अजित पवार असून त्यासंबंधित बैठकीत निर्णय झाल्याचं सांगितलं होतं. त्यावर आज जितेंद्र आव्हाड यांनी हल्लाबोल केला. ते म्हणाले की, 30 जूनला अजित पवार गटाने आम्ही बैठक घेऊन अजित पवार यांना अध्यक्ष केल्याचं जाहीर केलं. त्यांनी सांगितलं की आम्ही फोनवरून बैठक घेतली. परंतु फोनवरून अशी बैठक होत नाही. अजित पवारांना अध्यक्ष म्हणून कुणी नेमलं? त्यांना अध्यक्ष करण्यासाठी कुणी पाठिंबा दिला? यासंबंधित काहीही पुरावा नाही, अजित पवार गट खोटं बोलत आहे.
सोमवारची अजित पवार गटाची पत्रकार परिषद ही खोटं कसं खरं आहे हे दाखवण्यासाठी असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. ते म्हणाले की, अजित पवार यांनी 3 जुलैला मान्य केलं होतं की शरद पवार हेच आमचे अध्यक्ष आहेत. मग अचानक अजित पवार अध्यक्ष कसे काय झाले? पक्षातल्या 95 टक्के लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. शरद पवार यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहेत.
अजित पवार अध्यक्ष होण्यापूर्वी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सही कशी काय करतात? आणि त्याला पाठिंबा प्रफुल पटेल यांनी दिला होता. त्यांची देखील त्यावर सही होती असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
अध्यक्षपदासाठी आम्ही निवडणूक घेतली
आम्हाला पंजाब, केरळ, दिल्ली, तमिळनाडू, गुजरात, महाराष्ट्रासह जिथं आमचा पक्ष आहे तिथून सर्वांनी शरद पवार यांना अध्यक्ष करा अशी मागणी केली होती. त्यानंतर पक्षाच्या अध्यक्षपदासाठी शरद पवार यांचं नाव घोषित करण्यात आलं. आम्ही इलेक्शन घेतलं नाही असा त्यांनी आरोप केला होता, तो खोटा आहे. अध्यक्षपदासाठी आम्ही इलेक्शन घेतली होती आणि त्याची कागदपत्र आता निवडणूक आयोगाकडे सादर केली आहेत.
फक्त कलाकार बदलले
शिवसेना आणि राष्ट्रवादीची केस वेगळी आहे असं अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली. ते म्हणाले की, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीमागचे लेखक, पटकथा, दिग्दर्शक एकच आहेत, फक्त कलाकार बदलले आहेत.
भाजपसोबत जा असं म्हटलं नव्हतं
नागालँडचे आमदार म्हणाले की, आम्ही 30 जूनला पाठिंबा दिला. मग त्याच्या दुसऱ्या दिवशी प्रतिज्ञापत्र सादर का केलं नाही? त्यांनी प्रतिज्ञापत्र 21 ऑगस्ट 2023 ला सादर केले आहेत. याचे आमच्याकडे पुरावे आहेत. आम्ही त्यांना नागालँडच्या रियो यांच्या सरकारला पाठिंबा द्या असं पत्र दिलं होतं. त्यांना भाजप सोबत किंवा एनडीए सोबत जा असं कुठंही म्हटलं नव्हतं.
ही बातमी वाचा: