Sharad Pawar : राजकारणातील ही बाब गंभीर; राहुल गांधींना सुनावलेल्या शिक्षेवर शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
Sharad Pawar On Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुनावण्यात आलेली शिक्षा ही गंभीर बाब असून सर्वांनी चिंता करावी अशी असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.
Sharad Pawar On Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना सूरत कोर्टाने (Surat Court) सुनावलेल्या शिक्षेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी चिंता व्यक्त केली आहे. सरकारविरोधात भूमिका घेणाऱ्या नागरिकांचा, राजकीय पक्षांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न असून ही बाब गंभीर असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.
शरद पवार यांनी ट्वीट करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शरद पवार यांनी म्हटले की, देशातील मूलभूत हक्क, भाषण स्वातंत्र्य आणि लोकशाही अभिव्यक्ती दडपण्याच्या प्रयत्नांवर मी माझी गंभीर चिंता व्यक्त करतो. भारतातील राजकीय पक्ष, नेते आणि नागरिकांचा आवाज दाबण्याचा वारंवार होत असलेला प्रयत्न ही गंभीर चिंतेची बाब असल्याचे शरद पवार यांनी म्हटले.
राहुल गांधी यांच्याबाबत आज कोर्टाने दिलेला निकालदेखील हा मुद्दा अधोरेखित करत असल्याचे शरद पवार यांनी म्हटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पी.पी. मोहम्मद फैजल यांचेही प्रकरण असेच आहे. मी आपल्या राजकीय परिदृश्यातील या नवीन प्रवृत्तीचा निषेध करत असल्याचे त्यांनी म्हटले. आजच्या परिस्थितीत प्रत्येकाने चिंता करावी अशी बाब असल्याचेही पवार यांनी म्हटले.
Today’s judgement of Shri Rahul Gandhi underscores the point. NCP MP P. P. Mohammed Faizal’s case is also a similar case in point. I deplore this new trend in our political landscape, which should concern everyone in today’s scenario.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 23, 2023
राहुल गांधी यांना शिक्षा का सुनावली?
मोदी आडनावावरून विनोद करणं राहुल गांधींना (Rahul Gandhi) भोवलं. 2019 मध्ये मोदी आडनावावरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. सुरत कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. मोदी आडनावावरून टीका केली होती.
2019 साली राहुल गांधी यांनी कर्नाटकच्या कोलारमध्ये एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. 'सर्व चोरांची आडनाव मोदीच कशी असतात', असं राहुल प्रचारसभेत म्हणाले होते. त्याविरोधात गुजरातमधील एका भाजप आमदारांनं पोलिसांत तक्रार केली होती. राहुल यांनी आपल्या वक्तव्याने संपूर्ण मोदी समाजाची प्रतिष्ठा खाली आणल्याचा त्यांचा आरोप होता. त्यावर आज सुरत कोर्टाने आज राहुल गांधी यांना शिक्षा सुनावली.
राहुल गांधींना या खटल्यात जामीन मंजूर झाला आहे. या शिक्षेची अंमलबजावणी 30 दिवसांसाठी स्थगित करण्यात आली वरच्या कोर्टात जाण्यासाठी कोर्टानं राहुल गांधींना 30 दिवसांचा वेळ दिला आहे.