Maharashtra Politics : 'पवारांच्या सहमतीनं अजितदादांनी माझ्यासोबत सरकार स्थापन केले होते', देवेंद्र फडणवीसांच्या दाव्यावर NCP प्रमुखांचं उत्तर
Devendra Fadnavis : पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांशी चर्चा झाली होती असा गौप्यस्फोट उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.
Sharad Pawar On Devendra Fadnavis : पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांशी चर्चा झाली होती असा गौप्यस्फोट उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावरुन संतप्त राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही यावर प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत माणूस आहे. सभ्य माणूस आहे तरीही ते असत्याचा आधार घेत असं बोलतील मला कधी वाटलं नाही. कशाच्या आधारावर बोलले मला माहित नाही, असे शरद पवार म्हणाले.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?
2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये मुख्यमंत्रीपदावरुन वाद झाला होता. त्यानंतर अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या साथीनं सरकार स्थापन केले होते. पहाटेच्या या शपथविधीची राज्यभर चर्चा झाली होती. आजही याबाबत चर्चा होती. याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा खुलासा केला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यावेळी सत्तास्थापनेचा प्रस्ताव आला होता. 2019 मध्ये सरकार स्थापन करताना शरद पवार यांच्याशी चर्चा झाली होती. शरद पवारांच्या सहमतीनेच अजित पवार यांनी आमच्यासोबत सरकार स्थापन केले होते, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
पाहा काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस ?
रोहित पवार काय म्हणाले?
पहाटेच्या शपथविधीबाबत देवेंद्र फडणवीस यांनी एक गौप्यस्फोट केला आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. याबाबत शरद पवारांशी चर्चा झाल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल्याबाबत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांना विचारले असता, त्यावेळी जे काही घडलं ते केवळ शरद पवार आणि अजित पवार हेच सांगू शकतात...मात्र हा केवळ देवेंद्र फडणवीस यांचा सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न असल्याचे रोहित पवार म्हणाले. तसेच शिवसेना फोडण्यातही आमचा हात नसल्याचे म्हणणारे देवेंद्र फडणवीस यांनी नंतर हे स्वीकारले. आम्ही बदला घेण्यासाठी शिवसेना फोडली, असे फडणवीस म्हणाले होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांकडून अशी दुटप्पी भूमिका कशी पुढे येते? याचं आश्चर्य वाटतं. मागे ते म्हणाले की, मविआ मधील काही नेते त्यांच्याविरोधात काहीतरी कारवाई करणार होते, त्यातही काहीही तथ्य आढळून आलं नाही...तसंच त्यांचे आताच्या विधानात तथ्य नसल्याचे रोहित पवार म्हणाले.
अशोक चव्हाण काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस यांना हा साक्षात्कार निवडणुकीच्या तोंडावर कसा होतो ? हा एक प्रश्न आम्हा सर्वांसमोर आहे. पवार साहेब खूप ज्येष्ठ नेते आहेत, ते खूप मुरब्बी नेते आहेत. पवार साहेब असं कध ही करणार नाहीत. त्यांची आजवरची कारकीर्द राहिलेली आहे जे भूमिका घेतात ते खुलेआम घेतात. लपून छपून राजकारण करण्याचा त्यांचा स्वभाव नाही, असे अशोक चव्हाण म्हणाले.
फडणवीस यांनी केलेलं विधान हे संभ्रम निर्माण करण्यासारखं आहे. पवार साहेबांना संदर्भात केलेला वक्तव्य चुकीचं आहे. पिपंरी चिंचवड असो अथवा कसबा, महाविकास आघाडी सरकारकच्या जागा निवडून येतील. भाजपला अशा प्रकारची रणनीती आखण्याचा दुर्दैवी प्रकार करण्याची वेळ येत आहे, असेही अशोक चव्हाण म्हणाले.