Nawab Malik Meet Ajit Pawar : मोठी बातमी! अजित पवारांच्या भेटीसाठी नवाब मलिक 'देवगिरी'वर दाखल, चर्चांना उधाण
Nawab Malik Meet Ajit Pawar : राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.
Nawab Malik Meet Ajit Pawar : राज्याचे उपमु्ख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या भेटीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक (Nawab Malik) हे देवगिरी बंगल्यावर दाखल झाले आहेत. अजित पवारांचे शासकीय निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या काही नेत्यांची बैठक सुरू होती. त्याच दरम्यान मलिकदेखील दाखल झाले.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि इतर पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीदरम्यान मलिक हे देवगिरीवर दाखल झाल्याने पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.
विधीमंडळ अधिवेशनात सत्ताधारी बाकांवर
नुकत्याच पार पडलेल्या राज्याच्या विधीमंडळ हिवाळी अधिवेशनात मलिक यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी ते सत्ताधारी बाकांवर बसले. त्यामुळे त्यांनी शरद पवार यांची साथ सोडत अजित पवारांना साथ दिली असल्याची चर्चा सुरू झाली होती. तर, दुसरीकडे मलिक हे सत्ताधारी बाकांवर आल्याने विरोधी पक्षांनी भाजप आणि शिवसेना शिंदे गटावर टीकास्त्र सोडले होते. मलिक यांना अटक झाली तेव्हा भाजपने त्याचे कृत्य देशद्रोही असल्याचे म्हणत त्यांच्या अटकेच्या कारवाईचे समर्थन केले होते. तर, शिवसेनेत फूट पाडल्यानंतर शिंदे गटानेदेखील उद्धव ठाकरे यांनी मलिकांबाबत घेतलेल्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते.
राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर मलिक कोणाच्या बाजूने जाणार हा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात होता. पण हिवाळी अधिवेशाच्या पहिल्याच दिवशी मलिक हे सत्ताधाऱ्यांच्या बाजूने जाऊन बसले आणि या प्रश्नांना पूर्णविराम मिळाल्याची चर्चा सुरू होती. पण त्याच दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिलं आणि जोपर्यंत मलिकांचे आरोप हे खोटे आहेत, हे सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांना महायुतीमध्ये सामील न करुन घेण्याची विनंती केली. दरम्यान या पत्रामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली होती.
नवाब मलिक यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक
फेब्रुवारी 2022 मध्ये ईडीनं गोवावाला कंपाऊंड प्रकरणात मनी लाँड्रिंग कायद्याखाली नवाब मलिक यांना अटक केली होती. त्यानंतर नवा मलिकांनी प्रकृती अस्वास्थतेचं कारण देत अनेकदा जामीनासाठी अर्ज केला होता. गेल्या वर्षभरापासून मलिक कोर्टाच्या परवानगीनं कुर्ल्यातील खासगी रूग्णालयात घेत होते. मलिकांनी बऱ्याचदा जामीनासाठी अर्ज केला होता. पण त्यांचा जामीन अर्ज वारंवार फेटाळण्यात आला होता. अखेर 11 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयानं मलिकांना मोठा दिलासा देत, वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर केला होता. जामीनाची मुदत संपत असल्यामुळे मलिकांनी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज त्याप्रकरणी सुनावणी झाली आणि सर्वोच्च न्यायालयानं दिलासा देत नवाब मलिकांच्या जामीनाला मुदतवाढ दिली आहे.