Navratri 2022: नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवीच्या कालरात्री रुपाचं पूजन; जाणून घ्या आख्यायिका
नवरात्रीच्या आजच्या 7 व्या दिवशी देवीच्या कालरात्री रूपाची अर्थात कालिका देवीचे (Kalika Devi) पूजन केले जाते. कालरात्री रूपाची काय आहे आख्यायिका जाणून घ्या...
Navratri 2022: नवरात्रीच्या आजच्या 7 व्या दिवशी देवीच्या कालरात्री रूपाची अर्थात कालिका देवीचे (Kalika Devi) पूजन केले जाते. आजच्या दिवशी महालक्ष्मी पूजन (Mahalakshmi Pujan) देखील करण्याची प्रथा आहे तसेच देवीसमोर घागरी फुंकूल्या जातात. कालरात्री रूपाची काय आहे आख्यायिका जाणून घ्या...
दुर्गेचे सातवे रूप 'कालरात्री' या नावाने प्रसिद्ध आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्रीची पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन 'सहार' चक्रात स्थिर झालेले असते. यासाठी ब्रह्मांडाच्या समस्त सिद्धींचे दरवाजे उघडू लागतात. या चक्रात स्थिर झालेल्या साधकाचे मन पूर्णत: कालरात्रीच्या रूपाकडे आकर्षित झालेले असते. तिच्या साक्षात्कारापासून मिळणार्या पुण्याचा तो भागीदार होतो. त्याच्या संपूर्ण पापांचा नाश होतो. त्याला अक्षय पुण्य लोकांची प्राप्ती होते.
कालरात्रीच्या प्रत्येक श्वासाश्वासातून अग्नीच्या भयंकर ज्वाला
या देवीचा रंग काळा आहे. डोक्यावरील केस विस्कटलेले आहेत. गळ्यात विजेप्रमाणे चमकणारी माळ आहे. तिला तीन डोळे आहेत. हे तिन्ही डोळे ब्रह्मांडासारखे गोल आहेत. ते चमकदार आहेत. कालरात्रीच्या प्रत्येक श्वासाश्वासातून अग्नीच्या भयंकर ज्वाला निघतात. गाढव हे कालरात्री देवीचे वाहन आहे. वर उचललेल्या उजव्या हातातील वरमुद्रा सर्वांना वर प्रदान करते. उजवीकडील खालच्या हातात अभयमुद्रा आहे. तर डावीकडील वरच्या हातात लोखंडाचा काटा आणि खालच्या हातात खड्ग (कट्यार) आहे.
शुभ फळ देणारी असल्यामुळे तिचे नाव 'शुभंकारी'
कालरात्रीचे रूप दिसायला अत्यंत भयकारी आहे. परंतु ती नेहमी शुभ फळ देणारी असल्यामुळे तिचे नाव 'शुभंकारी' सुद्धा आहे. यामुळे भक्ताने भयभीत होण्याचे काहीही कारण नाही. देवी कालरात्री दुष्टांचा विनाश करणारी आहे. राक्षस, भूतप्रेत तिचे नाव ऐकताच घाबरून पळून जातात. ही देवी ग्रह संकटांनाही दूर करणारी आहे. या देवीचे भक्त पूर्णत: भयमुक्त असतात. कालरात्रीच्या भक्ताने यम, नियम, संयमाचे पूर्ण पालन केले पाहिजे.
तिन्हीसांजेनंतर देवीचे पूजन करण्याचे विधान
मन, वचन आणि देह पवित्र ठेवला पाहिजे. ती शुभंकारी असल्यामुळे तिच्या उपासनेने होणार्या शुभ कामांची गणना केली जाऊ शकत नाही. आपण नेहमी तिचे स्मरण आणि पूजा केली पाहिजे. कालरात्रि देवीला कालीमातेचे स्वरुपही मानले जाते. पार्वती देवीपासून कालीमातेची उत्पत्ती झाल्याचे सांगितले जाते. तिन्हीसांजेनंतर देवीचे पूजन करण्याचे विधान आहे. गंगाजल, पंचामृत, पुष्प, गंध, अक्षता यांनी देवीचे पूजन करावे. तसेच देवीला गुळाचा नैवेद्य दाखवावा, असे सांगितले जाते.
इतर महत्वाच्या बातम्या