Navi Mumbai Hospital News: महानगर पालिका रुग्णालयात औषधांचा तुटवडा; नवी मुंबईकरांचे हाल
Navi Mumbai Hospital News: नवी मुंबई महापालिकेतील रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा असल्याने सामान्य नागरिकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
Navi Mumbai Hospital News: नवी मुंबई महानगर पालिकेने (Navi Mumbai Municipal Corporation) शहरातील सर्व विभागात अत्याधुनिक रुग्णालये उभी केली असली तरी नवी मुंबईकरांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. नवी मु्ंबई रुग्णालयात औषधांचा तुटवडा (Medicine Shortage in Navi Mumbai Municipal Hospital) निर्माण झाला असून रुग्णांचे हाल होत आहेत. स्वस्त आणि माफक दरात उपचार उपलब्ध असल्याने अनेक सामान्य लोक महापालिकेच्या रुग्णालयात उपचारांसाठी येतात. मात्र, नागरिकांना इतर ठिकाणांहून महागडी औषधे खरेदी करावी लागत असल्याने त्यांना खिशावर भार पडत आहे.
नवी मुंबईकरांना मोफत आणि अल्प दरात आरोग्य सुविधा मिळावी यासाठी वाशी, नेरूळ, बेलापूर, ऐरोली विभागात महापालिकेने कोट्यवधी रूपये खर्च करून सुसज्ज अशी रुग्णालये उभी केली. कोरोना महासाथीच्या काळात या उभारलेल्या रुग्णालयांचा सामान्य नागरिकांना मोठा आधार मिळाला. या रुग्णालयांमुळे अनेक कोरोनाबाधितांवर वेळेत उपचार झाले. मात्र, आता गेल्या सहा महिन्यांपासून महानगरपालिकेची आरोग्य व्येवस्था कोलमडली असल्याचे दिसून येत आहे.
महानगरपालिका रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची कमतरता असल्याने वेळेत उपचार मिळण्यास अडचणी येतात. त्यातच आता औषधांचा मोठा तुटवडा जाणवू लागला आहे. महापालिका रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या रूग्णांना औषधे मिळत नसल्याने बाहेरून महागडी औषधे खरेदी करावी लागत आहेत. औषधे संपल्याने प्रिस्क्रिपशन देताना महानगरपालिकेच्या लेटरहेडवर न लिहिता साध्या कागदावर औषधे कोणती लागतील हे लिहून दिले जात आहे.
कोणत्या औषधांचा तुटवडा?
ताप, सर्दी, खोकला , रक्तदाब, लहान मुलांच्या वाढीसाठी आणि प्रसुतीसाठी आलेल्या महिलांसाठी लागणारी औषधे मिळत नाहीत. त्याशिवा, इन्सुलिनच्या सीरिंज, रक्ताचे नमुने घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सीरिंजदेखील शिल्लक नसल्याची माहिती आहे.
तुटवडा आणखी वाढणार?
जवळपास 40 ते 45 औषधांचा साठा येत्या काही दिवसात संपण्याची शक्यता आहे. नवीन औषध खरेदीसाठी गेल्या सहा महिन्यांपासून आरोग्य विभागात घोळ घातला जात आहे. मुख्य आरोग्य आधिकाऱ्यांनी औषधांच्या निविदा काढताना वितरकांऐवजी औषध उत्पादक कंपनी असा बदल केल्याने प्रतिसाद मिळाला नसल्याचे म्हटले जाते. महानगरपालिकेने अनेक वेळा निविदा काढूनही याला प्रतिसाद मिळत नसल्याने याचा परिणाम औषधांच्या पुरवठ्यावर झाला आहे. यामुळे महानगरपालिका आयुक्त याकडे लक्ष देतील का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: