Nashik Tomato : जी 20 परिषदेमुळे टोमॅटोची लाली घसरली? 200 रुपये किलोवरून थेट 5 रुपये किलोचा भाव, बळीराजा संतप्त
Nashik Tomato Rate : जी 20 परिषदेमुळे दिल्लीत टोमॅटो जाण्यास अडचणी येत असल्याचं व्यापाऱ्यांकडून उत्तर दिलं जात असल्याचं शेतकरी सांगत आहेत.
नाशिक : कांद्यापाठोपाठ (Onion Issue) गेल्या आठवडाभरापासून टोमॅटोच्या भावात मोठी घसरण झाल्याने राज्यभरात टोमॅटो उत्पादक शेतकरी (Tomato Farmers) संतप्त झाल्याचं बघायला मिळतंय. कुठे रस्त्यावर टोमॅटो फेकून तर कुठे कॅरेट जाळत शेतकऱ्यांकडून सरकारचा निषेध व्यक्त केला जातो आहे. ऑगस्ट महिन्यात जाळीमागे 600 ते 700 रुपये असणारे दर आज 80 ते 140 रुपयांवर आले आहेत. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला असून अनेक भागात टोमॅटो प्रश्न पेटला आहे.
कांद्यापाठोपाठ गेल्या आठवडाभरापासून टोमॅटोच्या (Tomato rate) भावात मोठी घसरण झाल्याने राज्यभरात टोमॅटो उत्पादक शेतकरी संतप्त झाल्याचं बघायला मिळत आहे. कुठे रस्त्यावर टोमॅटो फेकून तर कुठे कॅरेट जाळत शेतकऱ्यांकडून सरकारचा निषेध (Farmers Protest) व्यक्त केला जातो आहे. ऑगस्ट महिन्यात जाळीमागे 600 ते 700 रुपये असणारे दर आज 80 ते 140 रुपयांवर आले आहेत. किलोला 4 ते 5 रुपये भाव मिळत असल्याने उत्पादन खर्चही निघत नाही आणि या सर्व परिस्थितीमुळे बळीराजा हतबल झाला आहे. आवक वाढली तसेच जी 20 परिषदेमुळे दिल्लीत टोमॅटो जाण्यास अडचणी येत असल्याचं व्यापाऱ्यांकडून उत्तर दिलं जात असल्याच शेतकरी सांगत आहेत. अद्याप पावेतो पावसाने (Nashik Rain) समाधानकारक हजेरी न लावल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. रात्रीचा दिवस करत कसा बसा तो पीक घेत असतांनाच दुसरीकडे शेतमालाला भाव मिळत नसल्याने बळीराजा अडचणीत सापडला आहे.
नाशिकच्या निफाड (Niphad) तालुक्यातील नैताळे गावचे शेतकरी बाबाजी जेऊघाले हे गेल्या 5 वर्षांपासून आपल्या शेतात टोमॅटोचं पीक घेतात. यंदा त्यांनी एक एकर जागेवर टोमॅटोची लागवड केली होती. खते, औषधे, मजुरी, वाहतूक खर्च आणि ईतर असा सर्व मिळून आतापर्यंत दीड ते दोन लाख रुपये त्यांचे खर्च झाले विशेष म्हणजे रात्रीचा दिवस करत लहान मुलाप्रमाणे सांभाळ केलेलं पीक जेव्हा उभं राहिलं, बाजारात जेव्हा बाबाजी टोमॅटो विक्रीसाठी घेऊन गेले, तेव्हा त्यांच्या चांगल्या प्रतीच्या टोमॅटोला 145 रुपये क्रेट (20 किलोला) भाव व्यापाऱ्याने दिल्याने बाबाजींसमोर चिंतेचे ढग उभे राहिले. जी 20 परिषदेमुळे दिल्लीत टोमॅटो जाण्यास अडचणी येत असल्याचं व्यापाऱ्यांकडून त्यांना उत्तर दिलं गेलं. मिळालेल्या दरातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्याने जगावं तरी कसं? असाच प्रश्न ते उपस्थित करत आहेत.
पिंपळगाव, लासलगाव पाठोपाठ नांदगावातही भाव घसरले...
पिंपळगाव, लासलगाव बाजारात टोमॅटोचे भाव अवघा 100 रुपये कॅरेट विकल्यानंतर नाशिकच्या नांदगाव बाजारातही टोमॅटोला 20 रुपयांपासून तर 100 रुपये प्रती कॅरेट एवढाच भाव मिळाल्याने शेतकरी हवालदील झाला आहे... अस्मानी व सुलतानी संकटांनी भरडलेल्या शेतकऱ्याच्या टोमॅटोला ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीस 2500 रुपयांपर्यंत प्रति कॅरेट भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मात्र सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यातच अवघा 100 रुपयांपर्यंत टोमॅटोच्या कॅरेटला भाव मिळू लागल्याने शेतकऱ्याचे उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे...एकीकडे जगाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्याचा सन्मान करायचा अन् दुसरीकडे शेती उत्पादनाचे भाव पाडायचे, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आत्महत्या करावी का ? असा उद्विग्न सवाल शेतकरी करत आहे. 'शेतकऱ्याचे मरण हेच सरकारचे धोरण' अशी परिस्थिती सध्या शेतकऱ्यांची या सरकारने करून ठेवली आहे असा आरोप शेतकऱ्यांनी करत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.