Nashik Currency Note Press | पाच लाखांचे बंडल गहाळ प्रकरण : पर्यवेक्षकांकडून चुकून 'पंचिग' झाल्याचं उघड
आपल्यावर कारवाई होईल या भीतीपोटी या दोन पर्यवेक्षकांनी पंचिगंची माहिती करन्सी नोट प्रेस व्यवस्थापनेला दिली नाही. त्यामुळे या प्रकरणी चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.
नाशिक : नाशिकमधून करंन्सी नोट प्रेसमधून पाच लाखांची रक्कम गहाळ झाल्याने एकच खळबळ उडाली होती. अखेर या प्रकरणाचा उलगडा झाला असून कट पॅक विभागातल्या दोन पर्यवेक्षकांकडून नोटांचं बंडल चुकून 'पचिंग' म्हणजे नष्ट झाल्याचं चौकशीअंती समोर आलं आहे.
फेब्रुवारी महिन्यामध्ये या पर्यवेक्षकांकडून ही चूक झाली होती. ज्या वेळी सदोष नोटांचे पंचिंग करण्यात येत होतं त्यावेळी चुकुन 147 नंबरच्या चांगल्या नोटांचे बंडल पंचिंग करण्यात आलं होतं. त्यामुळे या नोटा चलनातून बाद झाल्या. पुढे ज्यावेळी ताळेबंदी केली गेली त्यावेळी पाच लाखांचे बंडल गहाळ झाल्याचं समोर आलं होतं. सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक असताना या नोटा गहाळ कशा झाल्या असा सवाल करण्यात येत होता. व्यवस्थापनाने प्रेसमध्ये सर्व चौकशी केली होती परंतु त्यांच्या हाती काही लागलं नव्हतं. अखेर हे प्रकरण पोलिसांपर्यंत जाऊन 13 जुलैला गुन्हा दाखल झाला होता.
नाशिक पोलिसांनी या प्रकरणी नोटा छपाईचा पूर्ण मार्ग कसा आहे याची माहिती घेतली आणि या प्रकरणी दहा-बारा दिवस चौकशी केल्यानंतर त्यांची संशयाची सुई या दोन पर्यवेक्षकांकडे गेली होती. ज्यावेळी संपूर्ण तपास हा त्या दोन पर्यवेक्षकांकडे आला त्यावेळी त्यांनी स्वत: ही चूक मान्य केली. आमच्याकडून ही चूक झाल्याचं त्यांनी पोलिसांसमोर कबुल केलं. आपल्यावर कारवाई होईल या भीतीपोटी आपण याची माहिती प्रशासनाला कळवली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. या दोन पर्यवेक्षकांनी आपली चुक कबुल केल्याने या प्रकरणी आता पडदा पडला आहे. दरम्यान आता करन्सी नोट प्रेसच्या व्यवस्थापनानं पर्यवेक्षकांवर कारवाई केल्याचं कळतंय. हा अपराध क्रिमिनल स्वरुपाचा नसल्याने पोलीस आता यावर कायदेशीर सल्ला घेत आहेत
काय असतं पंचिग?
ज्यावेळी नोटांची छपाई होऊन त्या चलनामध्ये येण्याच्या तयारीत असतात त्यावेळी सदोष नोटांना दोन छिद्रं पाडली जातात त्याला पंचिंग असं म्हटलं जातं. एकदा पंचिंग झाल्यानंतर या नोटा चलनामध्ये आणल्या जात नाहीत. पंचिंग केलेल्या अशा नोटांचे छोटे-छोटे तुकडे करुन त्या नष्ट केल्या जातात.