असाही जिव्हाळा... शहीद पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासोबत पोलीस अधीक्षकांनी साजरी केली दिवाळी
Nandurbar News : कोरोना काळात कर्तव्यावर असताना आपले प्राण गमावणाऱ्या शहीद पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसोबत पोलीस अधिक्षकांनी दिवाळी साजरी केली आहे.
Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात कोरोना काळात कोरोना योद्धे म्हणून पोलिसांनी 24 तास सेवा दिली. नागरिकांचं रक्षण करताना आपल्या जीवाची पर्व न करता कर्तव्य पार पाडलं. ही सेवा देताना 5 पोलीस अंमलदार शहीद झाले. शहीद झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांची दिवाळी गोड करण्यासाठी आणि त्यांच्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी पोलीस अधीक्षक पीआर पाटील यांनी या कुटुंबियांसोबत दिवाळी साजरा केली.
शहीद जवानांच्या घरी जाऊन दिवाळी साजरी
कोरोना काळात सेवा बजावत असताना पाच कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहीद झालेले पोलीस त्यांच्या कुटुंबातील एकमेव कमवते व्यक्ती होते. घरातील कर्ता व्यक्ती गेल्यानं कुटुंबियांना मोठा धक्का बसला होता. या धक्क्यातून सावरण्यासाठी पोलीस अधिक्षकांनी सर्व अधिकाऱ्यांना सोबत घेऊन शहीद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करून त्यांच्या दुःखावर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला आहे. पोलीस दलाचा कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी शहीद झालेल्या पोलीस अंमलदारांच्या कुटुंबियांना कपडे तसेच फराळ आदी साहित्य त्यांच्या घरी पोहोचवून त्यांच्यासोबत काही काळ घालवत दिवाळी साजरी केली. पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आजही आपली इतकी काळजी घेत असल्याचं पाहून शहीद पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्यानंतरही पोलीस दल घेत असलेली काळजी पाहून त्यांचे डोळेही पाणावले.
शहीद पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांची जबाबदारी स्विकारणार
शहीद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांची जबाबदारी पोलीस दल घेणार असून शासनाकडून मिळणाऱ्या विविध योजनांचा फायदा तसेच या कुटुंबातील सदस्यांना अनुकंपातील सेवेसाठी मदत करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधिक्षकांनी दिली आहे. पोलीस दल एक परिवार असून परिवारातील सर्व सदस्यांची काळजी करणं ही माझी जबाबदारी असल्याचंही पोलीस अधिक्षक पीआर पाटील यांनी सांगितलं. यासोबत सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांसोबत स्नेह मिलनाचा कार्यक्रम ठेवत त्यांच्या ही समस्या जाणून घेत सोडविण्याचं आश्वासन दिल्यानं पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील पोलीस दला विषयी भावना दृढ होताना दिसत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :