भोंगेच काय पण कोणत्याच कार्यक्रमाला नसतात लाऊडस्पीकर, नांदेडमधील बारड गावचा आदर्श निर्णय
Nanded News Update : नांदेड जिल्ह्यातील बारड गावाने पाच वर्षापूर्वी म्हणजे 31 जानेवारी 2018 रोजी गावातील सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे बंद केले आहेत.
Nanded News Update : मशिदीवरील भोंग्यांवरून राज्यात सध्या राजकारण तापलं आहे. परंतु, सध्या चर्चा होत आहे ती नांदेड जिल्ह्यातील बारड गावच्या आदर्श निर्णयाची. बारड गावाने पाच वर्षापूर्वीच म्हणजे 31 जानेवारी 2018 रोजी गावातील सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे बंद केले आहेत.
मशिदीवरील भोंगे उतरवले नाहित तर मशिदीपुढे हनुमान चालिसा म्हटली जाईल, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. शिवाय 3 मे पर्यंत राज्यातील सर्व मशिदींवरील भोंगे काढून टाकण्याचा अल्टिमेटही राज ठाकरे यांनी दिला आहे. राज ठाकरे यांच्या या भूमिकेवर राज्यातील अनेक मुस्लिम संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. परंतु, काही मुस्लिम संघटनांनी समन्वयाची भूमिकाही घेतली आहे. परंतु, अशा कोणत्याही वादाशिवाय समन्वयातून मार्ग काढत बारड गावाने घेतलेल्या निर्णयाचे सध्या समाज माध्यमातून कौतुक होत आहे.
नांदेड जिल्ह्यातील बारड गावची लोकसंख्या 19 ते 20 हजारच्या आसपास आहे. या गावात हिंदू, मुस्लिम,बौद्ध आणि जैन धर्माचे लोक अनेक वर्षांपासून गुण्यागोविंदाने राहत आहेत. गावात हिंदू धर्मीयांची जवळपास 12 मंदिरे आहेत. यातील शितला देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे. हे जागृत देवस्थान असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. या श्रद्धेपोटी मराठवाड्यासह, महाराष्ट्राचा सीमावर्ती भाग असणाऱ्या आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक राज्यातून भावीक दरवर्षी मोठ्या संख्येने दर्शनासाठी हजेरी लावतात.
शितला देवीसह गावात मुस्लिम समाजाचे प्रार्थना स्थळ म्हणजेच एक मस्जिद आहे. तर गावात दोन बौद्ध विहार असून एका जैन मंदिरासह गावात 16 धार्मिक स्थळे आहेत. परंतु, यातील एकाही धार्मिक स्थळावर भोंगा पहावयास मिळत नाही. एवढेच नाही तर गावातील लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम, राजकीय सभा, मेळावे, यात्रा, शैक्षणिक कार्यक्रम असो किंवा सामाजिक कार्यक्रमात देखील लाऊडस्पीकर लावला जात नाही.
नांदेड शहरापासून 25 किलोमीटर अंतरावर असणारे हे गाव सधन आणि शंभर टक्के बागायती गाव म्हणून जिल्हाभरात चिरपरिचित आहे. गावात दोन महाविद्यालये, चार शाळा, शासकीय रुग्णालय, दवाखाने व 16 धार्मिक स्थळे आहेत. पाच वर्षापूर्वी गावातील सर्व धार्मिक स्थळांवर भोंगे होते. या भोंग्यांचा विद्यार्थी आणि रुग्णांसह वृद्ध नागरिकांना नाहक त्रास होत होता. धार्मिक स्थळांवरील ध्वनीक्षेपातून ध्वनी प्रदूषणही मोठ्या प्रमाणात होत होते. या भोंग्यांमुळे गावातील काही तरुण धार्मिक तेढ वाढवून तंटे करत होते. त्यामुळे या सर्व गोष्टींवर उपाययोजना म्हणून तत्कालीन सरपंच बाळासाहेब देशमुख यांनी सर्वानुमते गावात भोंगा बंदीचा निर्णय घेतला आणि सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवण्यात आले.
बाळासाहेब देशमुख यांनी 30 जानेवारी 2018 रोजी ग्रामपंचायतमध्ये एक ग्रामसभा घेतली. त्यामध्ये सर्व धर्मातील प्रमुख नागरिक उपस्थित होते. या सभेत भोंग्यांच्या त्रासाबद्दल चर्चा करण्यात आली. त्यानुसार गावातील सर्व धर्माच्या लोकांनी सर्वानुमते देशमुख यांच्या या निर्णयास पाठींबा दिला आणि गावात भोंगा बंदी करण्यात आली. तेव्हापासून बारड गावात एकाही धार्मिक स्थळावर भोंगा लावण्यात आला नाही.
महत्वाच्या बातम्या