Nagpur News : नागपूर विद्यापीठातील प्राध्यापकाकडून 7 प्राध्यापकांना ब्लॅकमेल? कुलगुरुंसह राज्यपालांकडे लेखी तक्रार, प्रशासनाचं मौन
लैंगिक शोषणाची तक्रार असल्याची बतावणी करुन नागपूर विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. धर्मेश धवनकर यांनी सात सहकारी प्राध्यापकांकडून 15.50 लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे.
Nagpur : विविध कारणांमध्ये नेहमी चर्चेत असणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात (RTMNU) नवीन धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विद्यापीठाचे प्रभारी जनसंपर्क अधिकारी (PRO) आणि जनसंवाद विभागातील प्राध्यापक डॉ. धर्मेश धवनकर यांच्यावर सहकारी प्राध्यापकांनीच गंभीर आरोप केले आहेत. लैंगिक शोषणाची तक्रार असल्याची बतावणी करुन त्यांनी 15.50 लाख रुपये उकळल्याचा त्यांचा आरोप आहे. सात प्राध्यापकांनी एकत्रच कुलगुरुंसह (VC) राज्यपाल (governor) आणि मुख्यमंत्रांकडे लेखी तक्रार केली आहे. लोकप्रशासन विभागाचे प्रमुख डॉ. जितेंद्र वासनिक, प्रवास व पर्यटन विभागाचे प्रभारी प्रमुख डॉ. प्रियदर्शी खोब्रागडे, समाजशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अशोक बोरकर, ग्रंथालयशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सत्यप्रकाश निकोसे, अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सत्यप्रकाश इंदुरवाडे, जीवरसायन विभागप्रमुख डॉ. विरेंद्र मेश्राम, मराठी प्रभारी विभागप्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे अशी तक्रारकर्त्यांची नावे आहेत.
'डर्टी' आरोपांची भीती
प्राध्यापकांच्या तक्रारीनुसार, डॉ. धवनकर यांनी सातही जणांना काही मुलींनी तुमच्याविरोधात लैंगिक छळाची तक्रार दाखल केली आहे. त्यावरुन लीगल सेलची तथ्यशोधन समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात दोन वकिलांसह माझाही समावेश असल्याची भीती दाखवली. दोन्ही वकील माझे चांगले मित्र आहेत. मी तुम्हाला बाहेर काढतो, अशी बतावणी केली. सोबतच या सर्वासाठी खर्च करावा (Bribe) लागणार असल्याचेही सांगितले. प्रत्येकी 10 लाख जमा करण्याची ताकीद दिली. त्यानंतर काहींना सात तर काहींनी पाच लाख रुपये देण्याचे निश्चित झाले. 2 लाख ज्युनिअर तर 5 लाख वरिष्ठ वकिलाला देणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. प्राध्यापकांनी सर्व मिळून 15.50 लाख रुपये दिले. त्यानंतरही आणखी पैशांची मागणी केली जात होती. पैसे दिले नाही तर प्रकरण पुन्हा बाहेर काढण्याची धमकी दिली होती.
कमालीची गोपनियता, प्रशासन मौन
सातही प्राध्यापकांनी कुलगुरुंकडे 4 नोव्हेंबरलाच तक्रार केली आहे. मात्र, गंभीर प्रकरण असूनही विद्यापीठाने कमालीची गोपनीयता पाळली आहे. कुणीही बोलण्यास तयार नाहीत. तक्रार करुन सात दिवस लोटल्यावरही कोणतीच कारवाई करण्यात आली नाही, साधा खुलासाही मागितला गेला नसल्याने संबंधितांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच या संदर्भात विद्यापीठ प्रशासनाशी बोलण्याचा प्रयत्न केला असता अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही.
ही बातमी देखील वाचा