Murlidhar Mohol VIDEO : ए रांXX, नेता व्हायला कोल्हापुरात आलास का? पहिल्याच निवडणुकीत विरोधी गटाकडून धमकी; मुरलीधर मोहोळांनी सांगितला तो किस्सा
Murlidhar Mohol On Majha Katta : कुस्ती करताना अनेकदा तालीम चुकवली, त्याचा परिणाम म्हणून प्रत्येकवेळी शिक्षा व्हायची असं मुरलीधर मोहोळ यांनी सांगिलतं.
मुंबई: कोल्हापूरमध्ये कुस्ती करायला गेलो आणि बारावीत असताना कॉलेजच्या सीआरची निवडणूक लढवली, पण समोरच्या ग्रुपमधून धमकी आल्याची आठवण केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी सांगितली. 'ए रांXX, नेता व्हायला आलास का? गप घराकडे जायचं' अशी धमकी विरोधी ग्रुपकडून आली, पण निवडणूक लढली आणि बिनविरोध निवड झाली अशी पहिल्या निवडणुकीची आठवण मोहोळ यांनी सांगितली. मुरलीधर मोहोळ यांनी एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात हा किस्सा सांगितला.
कोल्हापूरला कुस्ती शिकायला
कुस्तीविषयी बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले की, माझ मूळ गाव मुठा हे कुस्तीसाठी प्रसिद्ध आहे. घरी वडील पैलवान, काका, आजोबा पैलवान होते. त्यामुळे घरच्यांची इच्छा होती की मी पैलवान व्हावं. त्यामुळे कोल्हापूरला गेलो. कुस्तीसाठी एका तालमीत प्रवेश घेतला आणि त्याच शहरात शिक्षणही सुरू केलं. माझी पदवी ही शिवाजी विद्यापीठाची आहे.
राजकारणाची बाराखडी कोल्हापुरातून सुरू
कोल्हापूरशी भावनिक नातं असल्याचं सांगत मुरलीधर मोहोळ म्हणाले की, कोल्हापुरात गेल्यावर कुस्ती आणि कॉलेज असं दोन्ही करायचो. कुस्तीच्या निमित्ताने राज्यभरातून पैलवान यायचे. त्यामुळे त्यांच्याशी चांगली ओळख झाली. तर शिक्षणाच्या निमित्तानेही अनेक ओळखी झाल्या. 12 वीला असताना ग्रुपने ठरवलं की कॉलेजचा सीआर व्हायचं. पण मी बाहेरचा असल्याने दुसऱ्या गटाने मला धमकी दिली. त्यातल्या एकाने मला बोलवले आणि मला म्हणाला, ए रांXX, नेता व्हायला आलास काय इकडं? गपगुमान घरी जायचं, असली कामं करायचं नाही. पण तालमीत असल्याने पैलवानांची ओळख होती. पैलवान भैय्या महाडिक यांची भेट घेतली आणि त्यांना सगळं सांगितलं. दुसऱ्या दिवशी भैय्या महाडिक माझ्यासोबत आले आणि धमकी देणारे शांत झाले. त्यावेळी मी बिनविरोध निवडून आलो. राजकारणाची बाराखडी मी कोल्हापुरातून शिकलो.
तालमीत सर्वाधिक शिक्षा झालेला पैलवान
तालमीमध्ये सर्वाधिक शिक्षा जर झाली असेल तर ती आपल्याला असं ते सांगताना मुरलीधर मोहोळ म्हणाले की, बावड्यात तालमीत जात असताना अनेकदा क्रिकेटसाठी तालीम बुडवली. एक दिवस सिनेमाला गेलो आणि रात्री उशीर झाला. त्यावेळी आम्हाला रात्रभर बाहेर ठेवलं. एका वेळी एक हजार सपाटे मारण्याची शिक्षा झाली. पण शिक्षा जरी झाली असली तर त्यामागे प्रेम आणि शिस्त होती.
उसाचा रस आणि दूध एकत्र करून पार्टी
लहानपणीची आठवण सांगताना मुरलीधर मोहोळ म्हणाले की, लहानपणी वडिलांनी सुरू केलेल्या उसाच्या गाड्यावर काम केलं. त्यावेळी तालमीत जायचो आणि नंतर उसाच्या गाड्यावर काम करायचो. त्यावेळी फार काही मोठं स्वप्न नव्हतं. वडील गाड्यावर नसले तर आम्ही चार पाच मित्र एकत्र यायचो आणि रस आणि दूध एकत्र करायचो आणि प्यायचो.
जगातली सर्वात मोठी दुर्घटना घडली असती
कोरोना काळातील आठवण सांगताना मुरलीधर मोहोळ म्हणाले की, कोरोनाच्या काळात पुण्यात 700 बेडचे जंबो कोव्हिड सेंटर सुरू केलं. रात्री 11 वाजता आयुक्तांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की फक्त एकच तास पुरेल एवढाच ऑक्सिजन आहे. गाड्या नेमक्या कुठे आहेत याचा पत्ता लागत नव्हता. माहिती घेताना अर्धा पाऊण तास गेला. त्यानंतर आयुक्तांचा फोन आला आणि ऑक्सिजनच्या गाड्या आल्याचं सांगितलं. त्यामुळे जगातली सर्वात मोठी दुर्घटना टळली. 700 पेशंट हे केवळ व्हेंटिलेटरवर होते. तो वाईट प्रसंग माझ्या डोळ्यासमोरून जात नाही.
ही बातमी वाचा :