(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गुप्तधनाच्या पैशावरून तरुणाचा खून, गुन्ह्यापासून बचावाकरता अपघात झाल्याचा केला बनाव, सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील प्रकार
गुप्तधनाच्या पैशाच्या वादातून खून झालेल्या तरुणाचा अपघात झाल्याचा बनाव सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यात करण्यात आला होता, ज्याचा शोध अखेर पोलिसांनी लावला.
सांगली : जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यात गुप्तधनाच्या पैशाच्या वादातून तरुणाचा खून झाल्याचं समोर आलं आहे. अवधूत शिंदे असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून गुप्तधन शोधण्यासाठी दिलेले पैसे परत दे म्हणून संबधित तरुणाला मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पुरावे नष्ट करण्यासाठी संबधित घटना हत्या नसून अपघात असल्याचा बनाव यावेळी करण्यात आला होता. पण आता चार महिन्यानंतर हा सर्व गुन्हा समोर आला असून कवठेमहांकाळ पोलिसांनी सहा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. यातील तिघांना अटक करुन तिघांचा शोध सुरू आहे.
संबधित सर्व तरुणांनी आधी गुप्तधन शोधण्याचा प्लॅन तयार केला. गुप्तधन न मिळाल्याने ते शोधण्यासाठी पैसे दिलेल्या अवधूत शिंदेची इतर सहा जणांनी मिळून हत्या केली. पण ही हत्या नसून अपघात असल्याचा बनाव करत सांगलीतील कवठेमहांकाळ तालुक्याच्या नागज घाटात 18 ऑक्टोबर, 2021 रोजी संबधित युवकाचा मृतदेह टाकत बुलेट बाईक त्याच्यापासून 10 फूट अंतरावर फेकली. पण शिंदेच्या कुटुंबियांना हा अपघात नसल्याची दाट शक्यता होती. त्यामुळे याबद्दलची कल्पना त्यांनी पोलिसांना दिली.
चार महिन्यात लावला शोध
अवधूतच्या कुटुंबाने संशय व्यक्त केल्यानंतर कवठेमहांकाळ पोलिसांनीही मागील चार महिन्यांत सांगली पोलीस विभागातील तांत्रिक विभागाची मदत घेत आणि काही गोपनीय माहितीच्या आधारे अवधूतच्या मृत्यू प्रकरणच्या मुळापर्यंत गेले. ज्यानंतर अवधूतचा अपघात नसून हा खून असल्याचे उघडकीस आले. संशयित सहा जणांनी अवधूत शिंदे याला गुप्तधन शोधण्यासाठी दिलेले पैसे परत दे म्हणून काठी, लोखंडी पाईपने मारहाण करून त्याचा खून केला होता. तसंच पुरावे नष्ट करण्यासाठी अपघाताचा बनाव करून मृत अवधूतचा मृतदेह आणि दुचाकी नागज घाटात टाकून दिली होती.
हे ही वाचा -
- Sangli Crime : सांगली जिल्ह्यात दोन दुर्देवी घटना; 5 जणांचा मृत्यू, जिल्ह्यात हळहळ
- माता न तू वैरिणी...! एक लाख रुपयांसाठी आईने पोटच्या मुलाला विकले, पुण्यातील घटना
- मुलुंडमध्ये पडलेल्या दरोड्याची तीन दिवसांत उकल; आठजणांच्या टोळीला बेड्या
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha